Pune News : पुणे, ता.१८ : सध्याच्या या आधुनिक युगात राखी पाठवण्याचे अनेक पर्याय उपलब्ध असले तरीही बहिणींचा भावाला पोस्ट ऑफिसमधून राखी पाठवण्याचा ट्रेंड जास्तच आहे. आजही भावाला राखी पाठवण्यासाठी बहिणी मोठ्या प्रमाणात पोस्ट ऑफिसवरच अवलंबून आहेत. त्यामुळेच रक्षाबंधनापूर्वी पुणे ग्रामीण डाक विभागाने विशेष राखी लिफाफे पोस्ट ऑफिसमध्ये अल्प किंमतीत विक्रीसाठी उपलब्ध करून दिले असल्याचे पुणे जिल्हा (ग्रामीण) डाकघर विभागाचे अधीक्षक बाळकृष्ण एरंडे यांनी सांगितले.
राखी लिफाफे पोस्ट ऑफिसमध्ये अल्प किंमतीत विक्रीसाठी
यंदा येत्या ३० ऑगस्टला रक्षाबंधन साजरा केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण डाक विभागाने सामान्य लोकांसाठी खास राखी लिफाफे विक्रीसाठी उपलब्ध केले आहेत. आकर्षक छपाई असलेले उच्च दर्जाचे, वॉटर प्रूफ राखी लिफाफे विक्रीसाठी पुणे जिल्ह्यातील सर्व डाकघरामध्ये खास व्यवस्था करण्यात आलेली आहे. (Pune News)
पावसाळी हवामान बघता हे लिफाफे पूर्णपणे वॉटर प्रूफ आणि सहज सील करण्यासाठी पील-ऑफ स्ट्रिप सील पद्धतीचा उपयोग करून बनविण्यात आलेले आहेत. या राखी लिफाफ्यांची किंमत फक्त १० रुपये ठेवण्यात आली आहे. राखी तत्काळ आपल्या भावापर्यंत पोहोचविण्यासाठी ग्राहकांनी हे लिफाफा स्पीड पोस्टमार्फत २० ग्राम वजनापर्यंतची राखी केवळ ४१ रुपये अतिरिक्त शुल्क देऊन इच्छितस्थळी तत्काळ पोहोचविण्याची विशेष व्यवस्था डाक विभागामार्फत करण्यात आली आहे. (Pune News)
देशातच नव्हे तर परदेशातही पाठवल्या जातात राख्या
रक्षाबंधनची लगबग आता पोस्ट ऑफिसमध्येही दिसू लागली आहे. राखी पाठवण्यासाठी महिलांची पोस्ट ऑफिसमध्ये रांगाच्या रांगा लागत आहे. रक्षाबंधनला बहिणीने भावाला पाठवलेली राखी रक्षाबंधनापूर्वी मिळावी, यासाठी पोस्ट ऑफिस विशेष प्राधान्य देत आहे. भावासाठी बहिणी देशातच नव्हे तर परदेशातही राख्या पाठवत आहेत. (Pune News)
विशेष राखी लिफाफे खरेदी करून राखी स्पीड पोस्टने पाठवावी
‘टपाल खात्याकडून राखी पाठवताना नागरिकांनी काळजी घ्यावी. पाकिटावर संपूर्ण पत्ता लिहावा. त्यात पिनकोड आणि लँडमार्क देखील लिहावा. लिफाफ्यावर, तुमचा आणि तुम्हाला ज्या व्यक्तीला पाठवायचे आहे त्याचा फोन नंबर लिहा. तसेच, लिफाफ्यात पैसे किंवा इतर मौल्यवान वस्तू ठेवू नका. सर्व नागरिकांनी आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये भेट देऊन विशेष राखी लिफाफे खरेदी करून राखी स्पीड पोस्टमार्फत पाठवावी’, असे पुणे जिल्हा (ग्रामीण) डाकघर विभागाचे अधीक्षक बाळकृष्ण एरंडे यांनी सांगितले. (Pune News)