Pune news : पुणे : यंदा मान्सूनने हुलकावणी दिल्यामुळे पाणीसाठ्यात लक्षणीय घट झाल्याचे जाणवत आहे. अशातच पुण्यासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात शुक्रवारी तापमानात लक्षणीय वाढ झाली. नागरिक उकाड्याने हैराण झाले. राज्यातील उच्चांकी ३८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद सोलापूरमध्ये झाली. तर पुण्यात ३२.३ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले, लोहगावमध्ये पारा ३३.९ अंशांवर पोहोचला होता. यंदाचा ऑगस्ट १९०१ नंतरचा सर्वाधिक उष्ण महिना मानला जात आहे.
पुण्यात ३२.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद
पुण्यात सकाळपासूनच उकाडा वाढला होता. उन्हाळ्याप्रमाणे चटके बसत होते. संध्याकाळनंतर आकाशात ढग दाटून आले; मात्र, पाऊस पडला नाही. शहरात किमान तापमानात देखील वाढ झाली होती. २२.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. (Pune news) पुण्यात संपूर्ण ऑगस्ट महिन्यात अवघे तीन दिवस पाऊस झाला. हा पाऊस एकूण ४३ मिलिमीटर होता. मान्सूनला पोषक वातावरण नसल्याने अजून काही दिवस समाधानकारक पावसाची चिन्हे नसल्याचे संकेत भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिले आहेत.
मराठवाडा आणि विदर्भातही परिस्थिती वेगळी नसून, सलग दुसऱ्या दिवशी अकोला, अमरावती, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, नागपूर सर्व शहरामध्ये सरासरीपेक्षा पाच अंशाने जास्त आणि ३५ अंश सेल्सिअसच्या पुढे तापमान नोंदवले गेले. राज्यात कुठेही पावसाची नोंद झाली नाही.
दरम्यान, वातावरणातील घडामोडींमुळे पुढील दोन दिवस वाढलेले तापमान स्थिर राहणार असून, कमालीचा उकाडा जाणवणार आहे. (Pune news) शहराच्या बहुतांश भागात शनिवारी संध्याकाळी ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या हलक्या सरींची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : राज्यात मान्सूनची हुलकावणी; खडकवासला धरण क्षेत्रात केवळ २७.६० टीएमसी पाणीसाठा
Pune News : जालन्यातील लाठीमारानंतर पुण्यात पोलीस बंदोबस्तात वाढ
Pune News: शिवाजीनगर न्यायालयातील कर्मचाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडले