Pune News | पुणे : वडापाव सेंटर चालकास जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात शिव ऋण युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अक्षय मोहन बोऱ्हाडे (वय-२७, रा. शिरोली बु, ता. जुन्नर) यांना जमीन मंजूर झाला आहे. हे आदेश खेड येथील जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एस.एन.राजुरकर यांनी दिले आहेत.
याप्रकरणी संतोष शंकरराव खोत (वय-४०, रा. शंकरपुरापेठ, जुन्नर, पुणे) यांनी जुन्नर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी अक्षय मोहन बो-हाडे (वय- २७) सुदर्शन शिवाजी विदाटे (वय २६) व विजय प्रकाश बोचरे (वय-२९) सर्व रा. शिरोली बु. ता. जुन्नर जि. पुणे यांना अटक केली होती. तर चार ते पाच अज्ञात इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संतोष खोत यांचे जुन्नर शहरात वडापाव सेंटर आहे. खोत हे त्यांच्या दुकानावर असताना आरोपी बोऱ्हाडे सह त्याचे सात ते आठ साथीदार २४ सप्टेंबर २०२२ रोजी तेथे आले. आरोपींनी फिर्यादी खोत यांना विचारले की, “तुझा भाऊ कोठे आहे. पोलिसात दिलेली तक्रार मागे घेण्यास सांग’ असे म्हणत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
त्यानंतर मानेवर चाकून वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. अशा आशयाची फिर्याद खोत यांनी जुन्नर पोलीस ठाण्यात दिली होती. गुन्हा दाखल होताच, पोलिसांनी आरोपी बो-हाडे, विदाटे व बोचरे यांना अटक केली होती.
सदर गुन्ह्यातून जामीन मंजुरीसाठी आरोपी अक्षय बोऱ्हाडे याने ऍड. गणेश माने यांच्यामार्फत अर्ज केला होता. सदरचा गुन्हा राजकीय द्वेषातून दाखल केलेला असून, दोषारोपपत्रातील पुराव्यावरून या घडीला हा गुन्हा आरोपीने केल्याचे सिध्द होत नाही.
गुणदोषावर खटल्याचे कामकाज चालल्यास, सदरचा गुन्हा आरोपींना केला आहे किंवा नाही, हे सिध्द होण्यास बराच कालावधी जाणार आहे. तोपर्यंत आरोपीला कारागृहात बंदीस्त ठेवणे न्यायाच्या दृष्टीने उचत नाही, असा युक्तीवाद ऍड. माने यांनी केला.
दरम्यान, ऍड. माने यांनी केलेले हे युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी बोऱ्हाडे याला जमीन मंजूर केला आहे. हे आदेश खेड येथील जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एस.एन.राजुरकर यांनी दिले आहेत. तर ऍड. माने यांना या खटल्यात ऍड. उमेश मांजरे, ऍड. धनंजय गलांडे आणि ऍड. रुक्सार मुल्ला यांनी सहकार्य केले.