Pune News : पुणे : तीन बाळांचा जन्म ही वैद्यकीय क्षेत्रातील दुर्मीळ घटना मानली जाते. औंध जिल्हा रुग्णालयात एका महिलेने नुकताच तीन बाळांना जन्म दिला आहे. विशेष म्हणजे आपल्या पोटात तिळे वाढत असल्याची महिलेला कल्पना देखील नव्हती. प्रसूतीवेदना सुरू झाल्यानंतर घरातच एका बाळाचा जन्म झाला. मात्र, महिलेला पुन्हा पोटदुखीचा त्रास होऊ लागल्याने, औंध जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात तिने आणखी दोन बाळांना जन्म दिला. सध्या बाळ आणि बाळंतीण सुखरूप आहेत.
दुर्मीळ घटना
तीन बाळांना जन्म देणाऱ्या या महिलेचे नाव नसीमा असे आहे. ती मूळची उत्तर प्रदेश येथील असून, सध्या पुण्यात वास्तव्यास आहे. नसीमाला याआधी तीन मुली आहेत. त्यानंतर ती पुन्हा गर्भवती होती. मात्र, आपल्या पोटात किती बाळ आहेत याची तिला माहिती नव्हती. तिने घरीच एका मुलाला जन्म दिला. त्यानंतर तिला औंध जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीनंतर पोटात आणखी दोन बाळ असल्याचे कळले. सायंकाळी ७ वाजून ५० मिनिटांनी दुसऱ्या मुलीला आणि ७ वाजून ५६ मिनिटांनी तिसऱ्या मुलीला जन्म दिला. दोन्ही मुलींचे वजन १४०० व १४५० ग्रॅम आहे. तर घरी जन्मलेल्या मुलाचे वजन १६२० ग्रॅम आहे.
दरम्यान, सध्या तिन्ही बाळांना ‘एसएनसीयू’ विभागात दाखल केले असून, ऑक्सिजन, सलाइन देण्यात आले आहे. अकरा दिवस पूर्ण झाल्यानंतर बाळांना आईचे दूध देण्यात येत आहे. आता बालकांना १५ दिवस झाले असून, लवकरच घरी सोडण्यात येणार आहे. तिळे जन्माला येणे ही दुर्मीळ घटना आहे. यापूर्वी २०१६ मध्ये चार बाळ जन्माला आले होते. जुळ्या बाळांचे प्रमाण जास्त आहे, असे औंध जिल्हा रुग्मालयातील एसएनसीयू विभाग प्रमुख डाॅ. सुरेश लाटणे यांनी सांगितले.
औंध जिल्हा रुग्णालयात २४ बालकांची क्षमता असलेल्या ‘एसएनसीयू’ कक्ष आहे. येथे प्रसूतीपूर्व जन्मलेल्या व अगदी अर्ध्या किलो वजनाच्या बाळांवर देखील यशस्वी उपचार झाले आहेत. तसेच हे सर्व उपचार मोफत होतात. बाहेर या उपचारासाठी प्रतिदिन १२ ते २५ हजार इतका प्रचंड खर्च येतो.