Pune News : भोर : खेड-शिवापूर येथे पुणे-सातारा रस्त्यालगतच्या एका खासगी हॉटेलच्या उद्घाटनासाठी तब्बल दहा ते बारा गावांमध्ये जाणारा सेवा रस्ता आठ तासांसाठी बंद ठेवण्यात आला होता. यामुळे स्थानिक नागरिकांची गैरसोय झाली. उद्घाटनावेळी या रस्त्याने जाणाऱ्या स्थानिक नागरिकांच्या अंगावर गाडी घालून दमदाटी करण्यात आली. यामुळे नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.
पुणे-सातारा महामार्गलगत असलेल्या सेवा रस्त्यावर एका खासगी हॉटेलच्या उद्घाटनासाठी शनिवारी (ता. २५) सायंकाळी सेलिब्रेटी येणार होते. त्यामुळे आठ तासांपासून हा सेवा रस्ता बंद करण्यात आल्याने, खेड शिवापूर तसेच शिवगंगा खोऱ्यातील स्थानिक नागरिकांना तसेच वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. मुख्य रस्त्यावर अव्यवस्थितरित्या गाड्या लावल्याने काही तास गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या.
दरम्यान, या कार्यक्रमाची आयोजकांनी परवानगी घेतली होती. मात्र, रस्ता बंद करण्यात येणार असल्याचा काहीही उल्लेख नसल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, उद्घाटनासाठी सेलेब्रिटी येणार असल्याने दुपारपासूनच पुणे-सातारा महामार्गावरील मुख्य सेवा रस्ता बंद केला. त्यामुळे प्रवाशांना पीएमपीएल, एसटी कोंढाणपूर फाट्याच्या पलिकडे एका थांब्यावर म्हणजेच खेड शिवापूर फाट्यावर उतरवत होते. त्यामुळे सुमारे एक कीलोमीटरची पायपीट प्रवाशांना करावी लागत होती.
कार्यक्रमानिमित्त आलेल्या अनेक मान्यवरांनी मुख्य रस्त्यावर वाहने लावल्यामुळे काही तास मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. हा प्रकार खेड शिवापूर पोलीस चौकीपासून पाचशे मीटर अंतरावर घडत असतानाही पोलीस प्रशासन मात्र संबंधित ठिकाणी फिरकेले सुद्धा नाही. या दरम्यान एखादी मोठी दुर्घटना घडल्यास त्याला कोण जबाबदार राहणार, असे अनेक प्रश्न स्थानिकांकडून उपस्थित केले जात होते.
यासंबंधी राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांना विचारले असता, खासगी हॉटेलच्या उद्घाटनासाठी सेलिब्रेटी येणार असल्याने काही काळ रस्ता बंद करून तो पुन्हा सुरू करणार आहे, असे सांगण्यात आले.