Pune News : पिरंगुट : गेल्या काही दिवसांपासून पिरंगुट (ता.मुळशी) घाटामध्ये सातत्याने अपघात होताना दिसत आहेत. त्यात आज (दि.10) पुन्हा एकदा अपघात झाला. ब्रेक फेल झाल्याने पुण्याहून पौडच्या दिशेने जाणारा मालवाहू ट्रक लवळे फाटा येथील असलेल्या ऑक्सफोर्ड मॉलच्या पार्किंगमध्ये घुसला. हा अपघात सकाळी सव्वा दहाच्या सुमारास झाला.
ब्रेक निकामी झाल्याने घडला अपघात
पिरंगुट घाटामध्ये अनेकदा अपघात होत आहेत. त्यामुळे या घाटाला मृत्यूचा घाट म्हणूनही ओळखले जाऊ लागले आहे. त्यातच आज पुन्हा एकदा अपघात झाला. (Pune News) सिमेंटच्या विटा घेऊन जाणाऱ्या ट्रकचा (MH12 QG 3381) अपघात झाला. यामध्ये घाटामध्येच ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने घाटाच्या उताराने खूप वेगाने हा ट्रक लवळे फाट्यापर्यंत आला. त्यावेळी ट्रकचे चालक मारुती भागवत कदम (वय 42 रा.वडगाव बुद्रुक ता,हवेली जि.पुणे) यांनी प्रसंगावधान राखत उजव्या बाजूला असलेल्या लाईटच्या खांबाला धडकवला. मात्र, या ट्रकचा वेग इतका जोरात होता की या ट्रकने जमिनीमध्ये पुरलेल्या या लाईटच्या पोलला जमिनीमधून उपटून सोबत घेऊन चालू असलेल्या विद्युत वाहक तारा तोडून लवळे फाटा येथे बाजूला असलेल्या ऑक्सफर्ड मॉलच्या पार्किंगमध्ये जाऊन पडला. यामध्ये ट्रकची पुढील दोन्ही चाके तुटून बाजूला पडली.
ट्रकचालकाचे होतंय कौतुक
या दुर्घटनेमध्ये ट्रकचालकाने प्रसंगावधान राखून गाडीचे ब्रेक फेल झाल्यानंतर ट्रक रस्ता सोडून उजव्या बाजूला लाईटच्या पोलला धडकवला. त्याच्या या कामाचे विशेष कौतुक केले जात आहे. (Pune News) जर चालकाने वेळीच सावधानता बाळगली नसती तर पुढे मोठी दुर्घटना घडली असती. दरम्यान, या संपूर्ण घटनेची नोंद पौड पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली असून, या घटनेचा पुढील तपास हा वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक रमेश गायकवाड व निवास जगदाळे हे करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : ऑक्टोबरमध्ये लोहगाव विमानतळावरील नवीन टर्मिनल सुरु होणार
Pune News : ‘डीएसकेडीएल’चे अस्तित्व संपुष्टात; अडीच कोटींच्या समभागांची किंमत शून्य