Pune News : पुणे : केंद्र सरकारने राज्यात एकूण एक कोटी ६३ लाख निरक्षर नागरिक असल्याची गावनिहाय आकडेवारी पाठवली आहे. त्यानुसार आता प्रत्येक गावातील निरक्षरांचा शोध घ्या, असे फर्मान स्थानिक पातळीवरील अधिकाऱ्यांनी शाळांसाठी काढले आहे. मात्र, प्राथमिक शिक्षकांपाठोपाठ आता माध्यमिक शाळांतील शिक्षकांनीही नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत सुरू करण्यात आलेल्या निरक्षरांच्या सर्वेक्षणावर बहिष्कार घातला आहे.
माध्यमिक शिक्षकांना सर्वेक्षणाच्या कामातून वगळण्याची मागणी
पुढील चार वर्षांत पाच कोटी नागरिकांना साक्षर करण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारने ठेवले आहे. त्यापैकी १२ लाख ४० हजार नागरिकांना साक्षर करण्याचे लक्ष्य महाराष्ट्राला दिले आहे. राज्यस्तरावर अगदी दीड कोटी नाही, पण १२ लाख ४० हजारांचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तेवढे निरक्षर शोधण्याचे काम शिक्षण विभागाला करावे लागणार आहे. (Pune News) मात्र, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाने शिक्षण विभागाला निवेदन देऊन माध्यमिक शिक्षकांना सर्वेक्षणाच्या कामातून वगळण्याची मागणी केली आहे. माध्यमिक शिक्षकांना यातून न वगळल्यास बहिष्कार घालण्याची भूमिका निवेदनात स्पष्ट करण्यात आली आहे.
शिक्षकांना निवडणूक आणि जनगणना वगळता अन्य शालाबाह्य कामे देता येत नसल्याची तरतूद शिक्षण हक्क कायद्यात आहे. तसेच अशैक्षणिक कामांमुळे अध्यापनाला वेळ मिळत नसल्याने निरक्षर सर्वेक्षणाचे काम शिक्षकांना देऊ नये, असे निवेदन प्राथमिक शिक्षकांच्या विविध संघटनांकडून शिक्षण संचालनालयाच्या योजना विभागाचे संचालक महेश पालकर यांना देण्यात आले होते.(Pune News) निरक्षरांना साक्षर करणे आवश्यक असल्याने शिक्षकांनी या कामी सहकार्य करण्याचे आवाहन पालकर यांनी परिपत्रकाद्वारे केले. या पार्श्वभूमीवर मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष जे. के. पाटील, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर म्हात्रे, सचिव शांताराम पोखरकर यांनी माध्यमिक शिक्षकांना सर्वेक्षणाच्या कामातून वगळण्याचे निवेदन दिले.
दरम्यान, गेल्या १० वर्षांत शिक्षक, कर्मचारी भरती न झाल्याने अनेक माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक-कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. त्यामुळे शिक्षकांवर अध्यापनाचा ताण आहे. सर्वेक्षणाच्या कामामुळे तो आणखी वाढणार आहे. अनेक शिक्षकांना त्यांच्या वयोमानानुसार सर्वेक्षणाचे काम शक्य नाही, असे राज्यातील बहुतांश जिल्हा मुख्याध्यापक संघटनांनी म्हटले आहे. (Pune News) महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्हा मुख्याध्यापक संघटनांनी मुख्याध्यापक महामंडळाकडे सर्वेक्षणाच्या कामातून वगळण्याची मागणी केली आहे. त्यामुळे माध्यमिक शाळांमधील शिक्षकांना सर्वेक्षणाच्या कामामधून न वगळल्यास मुख्याध्यापक महामंडळाचा या सर्वेक्षणावर बहिष्कार असेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : निवृत्त सहायक पोलीस आयुक्त अनिस काझी यांचे अल्प आजाराने निधन