लोणी काळभोर, (पुणे) : गुलटेकडी येथील छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात तरकारी, भाजीपाल्याची किरकोळ विक्री बंद करण्याचा निर्णय कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने घेतला आहे. ‘मार्केट यार्डातील फळे भाजीपाला विभागातील गाळे शेतीमालाच्या ठोक व्यवसायासाठी दिले असून, गाळ्यावर आवक झालेल्या शेतीमालाची दुबार विक्री करू नये,’ असे परिपत्रक प्रशासनाने काढले आहे. (Pune News)
बाजार समितीचे सभापती आणि सचिव यांनी आदेश काढला..
मार्केट यार्डातील घाऊक बाजारात खरेदीसाठी किरकोळ बाजारातील विक्रेत्यांना बाजार समितीकडे नोंदणी करून परवाना घेणे बंधनकारक आहे. मात्र, मार्केट यार्डात नागरिक मोठ्या संख्येने भाजीपाला, तरकारी, कांदा, बटाट्याच्या किरकोळ खरेदीसाठी येत असतात. (Pune News)
विशेषत: रविवारी आणि सुटीच्या दिवशी मार्केट यार्डात खरेदीसाठी गर्दी असते. मार्केट यार्डातील गाळ्यांवर किंवा गाळ्यासमोर ‘डमी’ आडत्यांकडून नागरिकांना शेतमालाची विक्री केली जाते. ‘डमी’ आडते परवानाधारक आडत्यांकडून शेतमाल खरेदी करून बाजारातच त्याची विक्री करतात. या प्रकाराला आता बंदी घालण्यात आल्याने ‘डमी’ आडत्यांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे. बाजार समितीचे सभापती आणि सचिव यांनी हा आदेश काढला आहे. (Pune News)
मार्केट यार्डातील गाळ्यांसमोरील भागात ‘डमी’ आडत्यांकडून शेतमालाची किरकोळ विक्री केली जाते. त्या पार्श्वभूमीवर फळे भाजीपाला विभागात आलेला शेतीमाल प्रथमतः गाळ्यावर उतरवून घ्यावा. शेतीमालासाठी गाळ्यावर जागा शिल्लक नसेल, तर गाळ्यासमोरील १५ फूट अंतरात शेतीमाल ठेवावा. त्या १५ फूटांच्या पुढे वजन काटा, खुर्ची, शेतीमाल, टेबल किंवा छत्री ठेवल्याचे आढळून आल्यास संबंधित आडत्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असेही समिती प्रशासनाने आदेशात नमूद केले आहे. (Pune News)
तर परवाना निलंबित
फळे भाजीपाला विभागात प्रत्येक गाळ्यावर आडत्यास दोन मदतनीस किंवा सहायक ठेवता येतील. तसेच, परवानाधारक आडते आणि दोन मदतनीस यांनाच शेतमालाची विक्री करण्यास परवानगी आहे. त्या व्यतिरिक्त इतर व्यक्ती स्वतंत्र विक्री करताना आढळून आल्याचे संबंधित आडत्याचा परवाना निलंबित करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. (Pune News)
दहानंतर प्रवेश नाही?
सध्या मार्केट यार्डात दुपारी दोन वाजेपर्यंत खरेदीचे व्यवहार चालतात. मात्र, यापुढे फळे व तरकारी विभागात सकाळी दहा वाजेपर्यंत आणि कांदा-बटाटा विभाग दुपारी दोन वाजेपर्यंत खरेदीदारांसाठी खुला असणार आहे. दहानंतर खरेदीचे व्यवहार होणार नसल्याने नागरिकांना दहानंतर प्रवेश दिला का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. (Pune News)
डमी आडत्यांचे काय होणार?
कृषी उत्पन्न बाजार समितीने यापूर्वी एका गाळ्यावर दोन ‘डमी’ आडत्यांना व्यवसायास परवानगी दिली आहे. मात्र, आता बाजारात घाऊक बाजारातून माल खरेदी करून तेथेच विक्री करण्याला बंदी घातल्याने ‘डमी’ आडत्यांचे काय होणार असा, प्रश्न उपस्थित होत आहे. (Pune News)