Pune News : पुणे आणि पिंपरी-चिंचवड या जुळ्या शहरांमध्ये उद्या, शुक्रवार २3 जानेवारी, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सायकल स्पर्धेमुळे जनजीवनावर मोठा परिणाम जाणवणार आहे. ‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर’ या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी प्रशासन, उद्योग आणि पोलीस यंत्रणा पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरली असून, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शाळा, उद्योग आणि वीजपुरवठ्याच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आले आहेत.
उद्योगांना सुट्टी, मार्ग मोकळा
या स्पर्धेचा महत्त्वाचा टप्पा भोसरी एमआयडीसी परिसरातून जाणार आहे. शाहूनगर, टेल्को रोड, स्पाईन सिटी चौक या प्रमुख मार्गांवरून सायकलस्वार धावणार असल्याने, पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेने पुढाकार घेतला आहे. संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी एमआयडीसीतील उद्योगांची नेहमीची गुरुवारची साप्ताहिक सुट्टी बदलून शुक्रवारी देण्यात आली आहे. यामुळे उद्या या परिसरातील सुमारे ६ हजार कंपन्या बंद राहणार आहेत.
उद्योगांना गैरसोय होऊ नये म्हणून महावितरणनेही गुरुवारी नियोजित असलेला वीज शटडाऊन शुक्रवारवर हलवला आहे.

पुण्यात शाळांना हाफ डे
स्पर्धेची सांगता पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर परिसरात होणार असल्याने मध्यवर्ती भागात मोठ्या प्रमाणावर वाहतूक वळवली जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची आणि पालकांची धावपळ टाळण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आदेश काढले आहेत.
त्याअनुसार, पुणे महापालिका हद्दीतील सर्व सरकारी व खासगी शाळा शुक्रवारी दुपारी १२ वाजेपर्यंतच सुरू राहतील, त्यानंतर सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
नागरिकांना आवाहन
बालेवाडीपासून सुरू होणारी ही स्पर्धा बालगंधर्वपर्यंत ५८ ते ७५ किलोमीटर अंतर पार करणार आहे. हा पुणे ग्रँड चॅलेंज टूरचा चौथा टप्पा असून, नागरिकांनी घराबाहेर पडताना वाहतूक बदलांची माहिती घेऊनच प्रवास करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
दरम्यान, आज स्पर्धेचा तिसरा टप्पा सासवड-बारामती दरम्यान होत असून, त्या भागातही दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत वाहतूक वळवण्यात आली आहे.
आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या निमित्ताने पुणे-पिंपरीचे नाव जागतिक पातळीवर झळकणार असले, तरी एक दिवसाचा हा बदल नागरिकांनी सहकार्याने स्वीकारावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.






