Pune News : पुणे : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाची वाहतूक स्वच्छ आणि सुंदर वातावरणात व्हावी, अशी सूचना एसटी महामंडळाचे अध्यक्ष व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. त्यानुसार केलेल्या सर्वेक्षणात पुण्यातील प्रमुख स्थानकांपैकी स्वारगेट आणि शिवाजीनगर (वाकडेवाडी) ही स्थानके काठावर उत्तीर्ण झाली असून, पुणे स्थानक अनुत्तीर्ण ठरले आहे.
विजेत्या स्थानकांना मिळणार दोन कोटींची बक्षिसे
स्वच्छ, सुंदर बस स्थानकांना प्रदेश व विभागनिहाय बक्षिसे दिली जाणार आहेत. पहिला क्रमांक पटकावणाऱ्या बसस्थानकांना प्रदेश व विभागनिहाय ५० लाख, २५ लाख, तर १० लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येईल. या अभियानांतर्गत बस स्थानकांना एकूण दोन कोटींची बक्षिसे दिली जाणार आहेत.
एसटी स्थानक म्हणजे अस्वच्छता, तंबाखू, गुटखा खाऊन थुंकणाऱ्यांच्या पिचकाऱ्यांनी रंगलेल्या भिंती, मोडलेली बाके, स्वच्छतागृहांची उबग आणणारी दुर्गंधी, असे चित्र सर्वसाधारणपणे डोळ्यांसमोर येते. हे चित्र बदलण्यासाठी आता मुख्यमंत्र्यांनीच पाऊल उचलले आहे. (Pune News ) स्वच्छ व सुंदर एसटी बस स्थानकांचे अभियान राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत झालेल्या सर्वेक्षणात स्वारगेट आणि शिवाजीनगर ही स्थानके काठावर उत्तीर्ण झाली असून, पुणे स्थानक अनुत्तीर्ण ठरले आहे.
एसटी महामंडळाने राज्यातील ५७७ एसटी बसस्थानके स्वच्छ, सुंदर बनवण्यासाठी बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान सुरू केले. यात राज्यातील सर्व बसस्थानकांचे मे आणि जून महिन्यातील कामगिरीचे मूल्यमापन जुलैमध्ये करण्यात आले. (Pune News ) दर दोन महिन्यांनी हे मूल्यमापन करून अंतिम गुण निश्चित करून विजेती स्थानके ठरविली जाणार आहेत. यात पुणे विभागातील ४२ स्थानकांचे सर्वेक्षण करून त्यांचे मूल्यमापन करण्यात आले.
दरम्यान, या वेळी केलेल्या सर्वेक्षणात पुण्यातील प्रमुख स्थानकांपैकी स्वारगेटला १०० पैकी ५९ गुण, शिवाजीनगरला ५२ गुण आणि पुणे स्थानकाला ४० गुण मिळाले. ५० गुणांच्या पुढे स्थानके उत्तीर्ण असल्याचे गृहित धरले जाते. म्हणजेच स्वारगेट आणि शिवाजीनगर ही स्थानके काठावर उत्तीर्ण झाली असून, पुणे रेल्वे स्थानक अनुत्तीर्ण ठरले आहे. पुणे विभागात नारायणगाव स्थानक ७४ गुणांसह प्रथम आले आहे.
मूल्यमापन करण्यासाठी परीक्षण समित्या नियुक्त केल्या असून, दर दोन महिन्यांनी मूल्यमापन सुरू आहे. बसस्थानक परिसर, स्वच्छतागृह, (Pune News ) बसची स्वच्छता, सुशोभीकरण या आधारे गुण दिले जातील. कर्मचाऱ्यांचे प्रवाशांसोबत सौजन्याने वागणे, उत्पन्न वाढीसाठी केलेले प्रयत्न, बसचे वेळापत्रक अशा प्रकारच्या प्रवासी अभियानासाठीही गुण दिले जातात.
याबाबत बोलताना एसटीचे विभाग नियंत्रक कैलास पाटील म्हणाले की, काही बसस्थानकांमध्ये आम्हाला गुण कमी मिळाले आहेत. त्याठिकाणी लोकसहभागातून दुरुस्ती आणि सुशोभीकरणाची कामे करण्याचे नियोजन आहे. दर दोन महिन्यांनी सर्वेक्षण होणार असून, स्थानकांचे चित्र बदलण्याचा प्रयत्न सुरू आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :