Pune News : पुणे : पुणे शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे साथीच्या आजारांमध्ये वाढ होत आहे. ताप, सर्दी, खोकल्यासह डेंगी आणि चिकुनगुन्याचा रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे निदर्शनास येत आहे. शहरात या महिन्यात १६१ संशयित रुग्ण सापडले असून, त्यातील १२ जणांना डेंग्यूचे निदान झाले आहे, अशी माहिती महापालिकेचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर यांनी दिली. जुलै महिन्यात डेंग्यूने एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
चिकुनगुन्याचा एक रुग्ण आढळला
वर्षभरात प्रथमच डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याची नोंद महापालिकेच्या आरोग्य विभागाने केली आहे. याच वेळी चिकुनगुन्याचा एक रुग्ण आढळला आहे. (Pune News) आतापर्यंत वर्षभरात चिकुनगुन्याचे एकूण ३ रुग्ण सापडले आहेत. डॉ. सूर्यकांत देवकर यांनी सांगितले, की मे महिन्यात डेंगीच्या एका संशयित रुग्णाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आतापर्यंत एकाही रुग्णाचा मत्यू झालेला नाही. सद्यस्थितीत शहरातील विविध भागांत फवारणी करण्यात येत आहे; तसेच महापालिकेच्या रुग्णालयात तपासणी आणि औषधांची व्यवस्था करण्यात आली आहे.
डासोत्पत्ती स्थाने आढळल्याप्रकरणी जुलैमध्ये ५२० निवासी आणि व्यावसायिक आस्थापनांना नोटीस बजावण्यात आल्या असून, त्यांच्याकडून ४६ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. (Pune News) वर्षभरात अशा प्रकारच्या १ हजार १३ नोटिशी बजावण्यात आल्या असून, एकूण एक लाख ३९ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
याबाबत बोलताना ससून रुग्णालयातील मेडिसीन विभागाचे प्रमुख डॉ. रोहिदास बोरसे म्हणाले की, पावसाळ्यामुळे सध्या सर्दी, ताप, खोकला या प्रकारचे रुग्ण वाढले आहेत. यातील काही रुग्णांमध्ये डेंगी आणि चिकनगुनियाची लक्षणे दिसून येत आहेत. ससून रुग्णालयातील रुग्णांच्या तपासणीचे काही नुमने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेत पाठवण्यात येत आहेत, तर काही नमुने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (एनआयव्ही) येथे पाठविण्यात येत आहेत. दोन्ही प्रयोगशाळा जवळ असल्याने तपासणी अहवाल लवकर मिळत आहे. यंदा डेंगीच्या गंभीर रुग्णांचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे रुग्ण लवकर बरे होत असल्याने दाखल होण्याचे प्रमाण कमी आहे. गेल्या दोन महिन्यांत करोनाचे रुग्ण आढळलेले नाहीत; तसेच ‘स्वाइन फ्लू’च्या रुग्णांची संख्यादेखील यंदा कमी आहे, असे बोरसे यांनी सांगितले.
ससूनमध्ये दररोज डेंग्यूचे दोन ते तीन संशयित रुग्ण दाखल होत आहेत. त्यांची एनएस-१ आणि आयजीएम चाचणी केली जात आहे. (Pune News) ही चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत आरटीपीसीआर चाचणीसाठी नमुने पाठविले जात आहेत. या महिन्यात आतापर्यंत ९१ नमुने पाठविण्यात आले असून, त्यातील ७ ते ८ जणांना डेंग्यूचे निदान झाले आहे, अशी माहिती ससून रुग्णालयातील औषधशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. रोहिदास बोरसे यांनी दिली.
शहरातील खासगी वैद्यकीय व्यवसायिक आणि पॅथॉलॉजी लॅब यांनी आढळून येणाऱ्या रुग्णांची संपूर्ण माहिती महापालिका आरोग्य विभागाला वेळेत कळवावी. माहिती विलंबाने पाठविणाऱ्या रुग्णालयांवर आणि पॅथॉलॉजी लॅबवर साथरोग अधिनियमानुसार कारवाई करण्यात येईल, अशा सूचना महापालिका प्रशासनाने केल्या आहेत. कॉलरा, जॅपनीज इन्सेफलायटिस, डेंगी, संसर्गजन्य कावीळ, मलेरिया, चिकनगुनिया, लेप्टोस्पायरोसिस, गॅस्टोइंट्रायटिस या आजारांच्या रुग्णांची माहिती कळवावी लागणार आहे.
आरोग्य विभागाने २५ जुलैपर्यंत शहरातील ४८३ जणांना नोटिशी पाठवल्या आहेत. यातून चार लाख ५६ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. गेल्या सात महिन्यांत ९९७ जणांना नोटीस पाठवल्या आहेत. यातून एक लाख ३८ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. (Pune News) शहरात गेल्या सात महिन्यांत डेंगीच्या ६२१ संशयित रुग्णांची नोंद झाली आहे. यातील ३३ रुग्णांचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : रिक्षा चालकाने दोन साथीदारांसह इंजिनिअरचे दीड लाख लुटले ; कात्रज परिसरातील घटना..
Pune News : फर्ग्युसन महाविद्यालयातील २० वर्षीय विद्यार्थ्याची हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या..