Pune News : खडकवासला : पावसाचे आगमन झाल्याने पुण्यातील सिंहगडावर पर्यटकांची चांगलीच गर्दी वाढली आहे. त्यामुळे पर्य़टकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. कारण
सिंहगड परिसरात मंगळवारी झालेल्या संततधार पावसामुळे घाटरस्त्यावर दरडींचा मुरूम व दगडगोटे निखळले. तसेच पुणे दरवाजा मार्गाचा भरावही खचला आहे. पावसाचा जोर आणखी वाढल्यास या रस्त्यावर धोकादायक दरडी कोसळण्याचा धोका आहे. यामुळे वन विभागाने पर्यटकांना सुरक्षेचे आवाहन केले आहे.
वन विभाग व बांधकाम विभागाच्या वादामुळे गेल्या दोन वर्षांपासून घाटरस्त्यावरील पहिल्या वळणावरील, तसेच इतर ठिकाणच्या दरडी संरक्षित करण्याचे काम ठप्प आहे. त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी पडून आहे. पावसाळ्यात घाटरस्त्यावर दरडी कोसळण्याचा धोका असूनही प्रशासनाचे दरडी संरक्षित करण्याकडे दुर्लक्ष होत आहे, त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यातही पर्यटकांवर दुर्घटनांची टांगती तलवार उभी आहे.
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी सुरक्षारक्षक तैनात
किल्ल्याच्या परिसरात मंगळवारी सकाळपासून संततधार सुरू असल्याने दुपारी दोनच्या सुमारास घाटरस्त्यावरील पहिल्या वळणावर असलेल्या दरडीचा मुरुम व दगडगोटे निखाळले. (Pune News) वाहतूक सुरू असली, तरी दरडीच्या भागात ये-जा करताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. पुणे दरवाजाखालील बुरुजावरील पाऊलवाटेचा भरावही कोसळला आहे. पावसामुळे पायी मार्गावर पाणी वाहत असून, ढासळलेल्या संरक्षक भिंतीतून पाण्याचे लोट वाहत आहेत.
वनरक्षक संदीप कोळी म्हणाले, ’दुपारी दोनच्या सुमारास पहिल्या वळणाजवळ अकराशे नंबरच्या पॉईंटवर दरडीचा काही भाग निखळला असून, दगड व मुरूम रस्त्यावर आला आहे. हा सर्व भराव रस्त्याच्या एका बाजूला असल्याने वाहतूक सुरू असून, पर्यटकांच्या सुरक्षेसाठी सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत.’
बांधकाम खात्याला घाटरस्त्यावरील दरडी, तसेच पुणे दरवाजा मार्गाच्या दुरुस्तीसाठी दीड कोटी रुपयांचा निधी दिला आहे. मात्र, अद्यापही दुरुस्तीचे काम केले नाही. (Pune News) कोसळल्या दरडीचा भाग तातडीने बाजूला हटविण्यात येणार आहे. अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप सकपाळ यांनी प्रसार माध्यमांना दिली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : लोणावळयाला जाताय? रेल्वेकडून ‘या’ लोकल झाल्यात तातडीने रद्द!