Pune News : पुणे : पुणे महापालिकेच्या आरोग्यपदावर कार्यरत असलेले डॉ. भगवान पवार यांची अवघ्या ५ महिन्यातच तडकाफडकी बदली मंगळवारी (ता.०५) करण्यात आली आहे.
५ महिन्याच्या कालावधीत बदली
भगवान पवार यांची सहाय्यक संचालक आरोग्य सेवा अंधत्व नियंत्रण कार्यक्रम मुंबई येथे बदली करण्यात आली आहे. तर भगवान पवार यांच्यासोबत जिल्हापरिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे यांचीही बदली करण्यात आली आहे. हंकारे यांची सहायक संचालक आरोग्य सेवा औदयोगिक विभाग मुंबई येथे बदली करण्यात आली आहे.
पुणे महापालिकेचे आरोग्यप्रमुख पदी डॉ. भगवान पवार यांची ११ मार्च २०२३ रोजी दोन वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, नियुक्तीच्या ५ महिन्याच्या कालावधीतच त्यांची बदली करण्यात आली आहे.
दरम्यान, गेल्या महिन्यात महापालिकेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. आशिष बंगीनवार यांना १० लाखांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले होते. यासाठी महापालिकेने एक चौकशी समिती नेमली होती. या नेमलेल्या समितीमध्ये डॉ. पवार यांचा समावेश होता, त्यांनी नुकताच चौकशी अहवाल आयुक्तांना सादर केला होता. या अहवालानंतरच त्यांची बदली करण्यात आल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.