Pune News : पुणे : तृतीयपंथी वर्गाचे समक्षमीकरण व्हावे, त्यांना नोकरीमध्ये संधी उपलब्ध करून द्यावी, यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू असताना पुणे महापालिकेनेही यामध्ये पुढाकार घेतला आहे. महापालिका सुरक्षा रक्षक म्हणून दहा तृतीयपंथीयांना नोकरीची संधी उपलब्ध करून देणार आहे. समाजाने त्यांच्या संवेदना जाणून घेतल्या पाहिजेत, कर्तव्य म्हणून प्रत्येकाने उपेक्षित आणि दुर्लक्षित घटकांप्रती सामाजिक जाणिवेतून काम केले पाहिजे. तृतीयपंथीयांबद्दलच्या दृष्टिकोनात बदल झाला पाहिजे, हा त्यामागचा उद्देश आहे.
दहा तृतीयपंथीयांना नोकरीची संधी
तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महापालिकेत नोकरी मिळावी, यासाठी काही सामाजिक संघटनांनी महापालिकेकडे मागणी केली होती. (Pune News) यासंदर्भात बैठकाही झाल्या होत्या. त्यामध्ये एकमत झाल्यानंतर प्रस्ताव मागविण्यात आले. पहिल्या टप्प्यात सुरक्षा रक्षक म्हणून दहा तृतीयपंथीयांना नोकरीची संधी मिळणार आहे. महापालिकेला कामाच्या ठिकाणी त्यांच्यासाठी सौहार्दाचे व खेळीमेळीचे वातावरण उपलब्ध करून देणे, स्त्री, पुरुष कर्मचाऱ्यांचे वर्तन चांगले ठेवणे यासाठी विशेष सूचना दिल्या जाणार आहेत.
उपजीविकेसाठी तृतीयपंथीयांना अनेकदा कोणी काम देण्यास तयार होत नाही. त्यामुळे काहीजण चुकीच्या मार्गाने पैसे कमावण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे सर्वच तृतीयपंथीयांबद्दल गैरसमज पसरतो. (Pune News) मात्र, अशा स्वरूपाची कामे करण्याची संधी मिळाल्यास लोकांच्या दृष्टिकोनात बदल होईल, असे तृतीयपंथीयांचे मत आहे. दरम्यान, दहापैकी पाच तृतीयपंथीयांना मुख्य इमारतीमध्ये तर इतर पाच जणांना महापालिकेच्या शहरातील इतर वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये नेमण्यात आले आहे.
तृतीयपंथीयांना अधिकार मिळावेत, यासाठी अनेक वर्षे न्यायालयात लढाई सुरु आहे. मात्र, यांना समाजमान्यता मिळणे, हे खूप मोठे आव्हान त्यांच्यासमोर उभे आहे.त्यांना कामाची प्रत्यक्ष संधी उपलब्ध करून दिल्यास समाजमान्यता मिळण्याच्या दृष्टीने त्यांची वाटचाल होऊ शकते. त्यामुळे पुणे महापालिकेने दिलेली संधी हे तृतीयपंथीयांसाठी मोठे संचित असणार आहे. महापालिकेने उचललेल्या या पावलामुळे इतरही अनेकजण तृतीयपंथीयांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी पुढे येतील, असा विश्वास या समाजघटकांना वाटत आहे.
पिंपरी महापालिकेतर्फे पेन्शन
मागील वर्षी दुर्लक्षित असलेल्या या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने सामाजिक क्रांतीचे दमदार पाऊल उचलले आहे. वयाची ५० वर्षे पूर्ण झालेल्या महापालिका हद्दीतील रहिवासी असणाऱ्या तृतीयपंथी व्यक्तींना आर्थिक मदत म्हणून दरमहा ३ हजार रुपये पेन्शन स्वरुपात देण्यात येते. (Pune News) समाजातील सर्व घटकांच्या सर्वांगीण उत्थानासाठी त्यांच्या जीवनामानावर दूरगामी सकारात्मक परिणाम करणारी ही पेन्शन योजना लाभदायी ठरत आहे.
पुरुषाची स्त्री झाली; पण नोकरीचं काय?
तनुश्री भोसले ही पुणे महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर सुरक्षारक्षक म्हणून काम करत आहे. काही दिवसांपूर्वी ती शुभम भोसले होती. आपले पुढील आयुष्य तृतीयपंथी म्हणून जगायचे तिने ठरवलं आणि लिंगबदलाची शस्त्रक्रिया करून ती पुरुषाची स्त्री झाली. (Pune News) पण नोकरीचे काय, असा प्रश्न तिच्यासमोर उभा राहिला. तिचा हा प्रश्न पुणे महापालिकेने सोडवला आहे. महापालिकेच्या या निर्णयाचे तनुश्रीने स्वागत केले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : जीवे मारण्याच्या धमकीनंतर छगन भुजबळ माध्यमांशी बोलले; म्हणाले, पवार कुटुंब…
Pune News : लवकरच मंत्रिमंडळ विस्तार; पुणे जिल्ह्याला किती मंत्री मिळणार?