Pune News : पुणे : उच्चशिक्षित कैदी तसेच एखाद्या क्षेत्रातील मोठा अनुभव गाठीशी असलेल्या कैद्यांच्या ज्ञानाचा विधायक कामासाठी उपयोग करून घेण्याच्या उद्देशाने पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने शिक्षा झालेल्या कैद्यांना कायद्याचे शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. हे उच्चशिक्षित असलेले कैदी इतरांना कारागृहात मार्गदर्शन करणार आहेत. मार्गदर्शनासाठी निवड झालेल्या कैद्यांना कायद्याची माहिती देण्यात येत असून, त्यांची ‘विधी स्वयंसेवक’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. येरवडा कारागृहातील २० कैद्यांची विधी स्वयंसेवक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
येरवडा कारागृहात कायदेविषयक मार्गदर्शन आणि समुपदेशन केंद्राची स्थापना
पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून २० कैद्यांची विधी स्वयंसेवक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. येरवडा कारागृहात विनामूल्य कायदेविषयक मार्गदर्शन आणि समुपदेशन केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. (Pune News) केंद्राचे कामकाज सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी कैद्यांनी ५० अर्ज सादर केले, अशी माहिती पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव सोनल पाटील यांनी दिली.
या केंद्राचा उद्घाटन सोहळा जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश श्याम चांडक यांच्या हस्ते आणि जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.एस. वाघमारे, कारागृह व सुधार सेवेचे विशेष पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर, सहायक संचालक (अभियोग) संध्या काळे आणि कारागृह अधीक्षक सुनील ढमाळ यांच्या उपस्थितीत नुकताच पार पडला.
येरवडा कारागृहात गेल्या अनेक महिन्यांपासून शिक्षा भोगत असलेल्या आणि चांगली वर्तणूक असलेल्या कैद्यांची स्वयंसेवक म्हणून निवड करण्यात आली आहे. चांगली वागणूक असलेल्या कैद्यांचा अहवाल प्राधिकरणामार्फत मागविण्यात आला होता. त्यातून २० कैदी निवडून त्यांना प्रशिक्षण देण्यात आले.
शिक्षेचा उद्देश कैद्यांचे पुनर्वसन असे आहे. जे कैदी दीर्घकाळ कारागृहात शिक्षा भोगत आहेत, त्यांचा वर्तणूक अहवाल मागविण्यात आला होता. काही कैदी अभियंते, डॉक्टर रोगी आहेत. (Pune News) त्यांना कायद्याचे ज्ञान आहे. अशा कैद्यांची विधी स्वयंसेवक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, असे त्यांनी नमूद केले.
गुन्हेगारांचे चारित्र्य बदलणे हे शिक्षेचे उद्दिष्ट असावे. शिक्षा हा सामाजिक नियमनाचा एक प्रकार आहे. पापाचा तिरस्कार करा, पाप करणाऱ्यांचा नव्हे, असे महात्मा गांधींनी सांगितले होते. या तत्त्वावर कारागृहात प्रशिक्षण आणि पुनर्वसन केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. (Pune News) त्यातून कैद्यांना त्यांचे अधिकार समजून ते अधिक चांगले नागरिक होवू शकतील. प्रशिक्षणाचा कोणी गैरफायदा घेणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे, असे पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव सोनल पाटील यांनी सांगितले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पुणे दशतवादी तपास प्रकरणी मोठी अपडेट ; एटीएसकडून तपासाची सूत्रे एनआयएकडे…