Pune News : पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा अचानकपणे सुरु झाल्यानंतर पुणे भाजपच्या गोटात हालचाली सुरू झाल्या आहेत. भाजप नेते संजय काकडे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून पुण्यातून निवडणूक लढवण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर प्रतिक्रीया देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, तो मोदींचा अधिकार आहे. ते देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांच्या नावावर दोन्ही वेळेला भाजपाच्या ३०० पेक्षा जास्त जागा निवडून आलेल्या देशाने पाहिल्या आहेत, असेही पवार यांनी सांगितले.
तर्क-वितर्कांना उधाण
पुणे, पिंपरी-चिंचवड या भागांमध्ये गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रवादीची ताकद वाढू लागली आहे. आता अजित पवार गट या भागात सक्रिय झाला असताना मोदी येथून निवडणूक लढवणार असल्याच्या वृत्तामुळे तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. (Pune News ) यासंदर्भात मुंबईत महायुतीच्या बैठकीसाठी आलेल्या अजित पवारांना माध्यमाच्या प्रतिनिधींनी या चर्चेबाबत विचारणा केली असता अजित पवार म्हणाले की, तो मोदींचा अधिकारच आहे. मोदींचा स्वत:चा मतदारसंघ पहिल्यापासून गुजरात आहे. असे असतानाही ते वाराणसीतून निवडून आले आहेत. सुरुवातीला तर दोन्ही मतदारसंघातून ते निवडून आले आहेत.
अजित पवार पुढे म्हणाले की, ही बातमी मी वाचली आहे. पण त्यापुढे प्रश्नचिन्ह आहे. निवडणुकीसाठी आपण कुठून उभे राहावे हा सर्वस्वी त्यांच्या पक्षाचा आणि त्यांचा स्वत:चा अधिकार आहे. (Pune News ) त्याप्रमाणे ते निर्णय घेतील. त्यामुळे अशा गोष्टींवर चर्चा करण्यात वेळ घालवणे योग्य नाही, असे माझे मत आहे, असेही अजित पवारांनी सांगितले.