Pune News : पुणे : कमी किमतीत आयफोन मिळण्याच्या आमिषाला एक पोलीस हवालदारच बळी पडला आहे. स्वारगेट पोलीस लाईनमध्ये राहणार्या या पोलीस हवालदाराची १ लाख १५ हजार रुपयांची फसवणूक झाली आहे.
१ लाख १५ हजारांची फसवणूक
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, फिर्यादी हे पोलीस हवालदार असून, आरोपी गणेश सुतार आणि ते दोघे मित्र आहेत. सुतार याने त्यांना कमी किंमतीत आयफोन मोबाईल घेऊन देतो, असे सांगून त्यांच्याकडून १ लाख १५ हजार रुपये घेतले. परंतु, आयफोन आणि पैसे परत दिले नाहीत. अखेर त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. (Pune News) त्यानुसार पोलिसांनी गणेश तुकाराम सुतार (रा. जनता वसाहत, पर्वती) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार एप्रिल २०२३ पासून घडल्याची माहिती मिळत आहे.
या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सरवदे करीत आहेत.