पुणे : पुण्यातील 91 बांधकाम प्रकल्पांचे काम थांबवण्याचे आदेश पुणे महापालिकेने दिले आहेत. बांधकाम प्रकल्पांच्या ठिकाणी धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी सूचना देऊनही महापालिकेच्या आदेशाकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. या कारवाईने पुण्यातील बांधकाम क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
पुण्यात नेहमीच बांधकाम सुरु असतात. या बांधकामाच्या धुळीमुळे आणि शहरातील रस्त्यांवर जड वाहनांची ये-जा यामुळे होणा-या वायू प्रदूषणाने पुणेकर त्रस्त झाले आहेत. यावर उपाय म्हणून केंद्र आणि राज्य सरकारांनी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार पीएमसीने बांधकाम व्यावसायिकांना धूळ कमी करण्याच्या उपायांचा अवलंब करण्याच्या वारंवार सूचना दिल्या आहेत.
बांधकाम विभागाने झोन 1 ते 6 मध्ये विभागलेल्या झोनमध्ये सर्वाधिक नोटीस झोन 5 ला दिल्या होत्या. झोन 5 मधील एकूण 67 बांधकामांना नोटीस पाठवण्यात आल्या होत्या. एका दिवसात शहरातील 158 बांधकाम प्रकल्पांना नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत. त्यातील 91 बांधकामांचे थेट कामच थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. असे निर्देश असूनही, अनेक बांधकाम व्यावसायिकांनी कठोर कारवाईचे संकेत देऊनही या पालनाकडे दुर्लक्ष केले आहे.
नेमकं काय लिहिलंय महापालिकेच्या नोटीसमध्ये?
महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या नियमांची पूर्तता न केल्यास आणि काम सुरू ठेवल्यास पुणे महानगर पालिकेने आम्हाला कारवाई करायचे अधिकार दिलेले आहे. महाराष्ट्र महानगरपालिकेचे अधिनियम 1966 चे कलम 54 च्यानुसार नोटीस मिळाल्यानंतर तातडीने बांधकाम थांबले पाहिजे, असे आदेश देण्यात आले आहेत. नोटीस मिळाल्यानंतरही काम चालू असल्यास पोलिसांच्या मार्फत करवाई केली जाणार असल्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.