संदीप बोडके
लोणी काळभोर (पुणे) : इराण, इराक व दुबई या अखाती देशाप्रमाणे पुणे शहरालगतच्या आळंदी म्हातोबाची (ता. हवेली) या गावातील एका शेतकऱ्यांच्या विहिरीला पिण्याच्या पाण्याबरोबर चक्क पेट्रोल-डिझेलचे झरे लागल्याचा आश्चर्यजणक प्रकार पुढे आला आहे. विशेष बाब म्हणजे संबधित शेतकऱ्याने मागील तीन महिन्यांच्या काळात विहीरातुन निघालेले दहाहून अधिक पेट्रोल-डिझेलचे टँकर लोणी काळभोर येथील हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीला मोफत पुरवल्याचेही पुढे आले आहे.
‘पुणे प्राईम न्यूज’च्या वाचकांनो ही बातमी वाचुन आश्चर्यचकीत झालात ना. पण, ही बातमी शंभर नव्हे तर एक लाख टक्के खरी आहे. ही किमया घडली आहे ती लोणी काळभोरचा इंधन माफिया प्रविण मडीखांबे व त्याच्या सहकाऱ्यांनी सहा महिन्यांपूर्वी केलेल्या इंधनचोरीच्या महान कामगिरीमुळे. इंधन चोरी प्रकरणात येरवडा कारागृहात असलेल्या एका इंधन माफियामुळे इराण, इराक व दुबई या अखाती देशाप्रमाणे आपल्याही देशात पिण्याच्या पाण्याबरोबर चक्क पेट्रोल-डिझेलचे झरे लागु लागल्याचे भाग्य ‘याची देही याची डोळा’ अनुभवयाचे भाग्य आळंदी म्हातोबाची व परीसरातील नागरीकांना लाभले आहे.
दरम्यान, संजय सुरेश जवळकर (वय-४०, रा. आळंदी म्हातोबाची, ता. हवेली) हे त्या विहिरीला पिण्याच्या पाण्याबरोबरच, चक्क पेट्रोल-डिझेलचे झरे लागलेल्या नशीबवान शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्या आळंदी म्हातोबाची (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील गट नंबर ९४४ मधील विहीरात मागील तीनहुन अधिक महिन्यांपासून तेलगळती होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लोणी काळभोर पोलिसांनी सहा महिन्यांपूर्वी प्रविण मडीखांबे व त्याचे दहाहुन अधिक सहकारी हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीची आळंदी म्हातोबाची परीसरातील डोंगरात जमिनीखालील पाईपलाईन फोडून त्यातून इंधनचोरी करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला होता. या प्रकरणात इंधन चोरीसाठी एचपी कंपनीची फोडलेली पाईपलाईन अद्याप तशीच असुन, यातुन होत असलेल्या इंधन गळतीमुळे आळंदी म्हातोबाची येथील एका शेतकऱ्यांच्या विहिरीला पिण्याच्या पाण्याबरोबरच, चक्क पेट्रोल-डिझेलचे झरे वाहत आहेत.
सदर शेतकऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, आळंदी म्हातोबाची (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील गट नंबर ९४४ मध्ये संजय सुरेश जवळकर (वय-४०, रा. आळंदी म्हातोबाची, ता. हवेली) व इतरांची जमीन आहे. त्यांच्या शेताच्या अर्धा किलोमीटर अंतरावरून हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीची पाईपलाईन गेलेली आहे. ती पाईपलाईन फोडून इंधन माफियांनी इंधन चोरी केली होती. इंधनमाफियांनी ज्या ठिकाणाहून पाईपलाईन फोडली होती, तेथून जवळकर यांच्या शेतातील विहारीमध्ये डीझेलचा पाझर आल्याने विहारीत डीझेल साठले आहे. त्यांच्या शेतातील विहरीत मागील तीन महिन्यांपासून डीझेल इंधन पाझरत आहे.
पेट्रोल-डिझेल माफिया यांनी आळंदी म्हातोबाची येथील पेट्रोलियम कंपनीच्या पाईपलाईनला भगदाड पाडून डिझेलची चोरी केली होती. यामध्ये कंपनीतील कामगाराचा समावेश असल्याने त्याच्यासह इथंन माफियातील बड्या माशाला जेलवारी झाली होती. या घटनेला काही महिन्यांचा कालावधी लोटला आहे. यानतंरही आळंदी म्हातोबाची येथील डोंगराच्या भागातून गेलेल्या पाईपलाईनमधून सुमारे पाऊण किलोमीटर अंतरावर असलेल्या संजय जवळकर यांच्या विहिरीमध्ये डिझेलचा पाझर सुरू आहे. यामुळे विहिरीतील पाणी शेतात सोडल्यास पीके जळण्याचा धोका असल्याने संबंधित शेतकऱ्याला चार एकर क्षेत्र पडीक ठेवावे लागले आहे.
एकीकडे पेट्रोलियम कंपनी कोणतेही इंधन चोरीला जात नसल्याचा दावा करत असले तरी पेट्रोलियम कंपनी शेतकऱ्यांच्या त्याच विहिरीवरून टँकर भरुन नेत असल्याची वस्तुस्थिती आहे. म्हणजेच इंधन माफियांनी पाईपलाईनला पाडलेले भगदाड अजून पुर्णपणे बंद झालेले दिसत नाही. कारण पाईपलाईनपासून सुमारे पाऊण किलोमीटर अंतरावरील विहिरीला अजूनही पाझर येत असेल, तर हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीची यंत्रणा लिकेज शोधण्यात अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, आळंदी म्हातोबाची हद्दीतील डोंगरात २५ जुलैला हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीची जमिनीखालील पाईपलाईन फोडून त्यातून इंधन चोरी करण्याचा प्रयत्न झाल्याचे उघड झाले होते. यात पोलिसांनी प्रविण मडीखांबे, विशाल धायगुडे, बाळू चौरे आणि कंपनीचा सेन्सर व व्हॉल्व्ह ऑपरेटर संकेत शेंडगे यांना अटक केली होती. ज्या कंपनीची पाईपलाईन फोडून प्रविण मडीखांबे व त्याच्या सहकाऱ्यांनी पेट्रोल-डिझेल चोरले, त्या हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या अधिकाऱ्यांनी नेमकी किती लिटरची इंधन चोरी झाली याबद्दल अद्यापही तोंड उघडलेले नाही.
याबाबत बोलताना शेतकरी संजय जवळकर म्हणाले, माझ्या मालकिच्या विहीरीत मागील तीन ते चार महिन्यांपासून तेल उतरत आहे. याबाबतची माहिती लोणी काळभोर येथील हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिलेली आहे. त्यांनी पाईपलाईन मधील गळती बंद करण्याऐवजी, मागील तीन महिन्यांच्या काळात एका मशीनच्या साह्याने विहीरीतील दहा ते बारा टॅंकर तेल भरून नेले आहे. विहीरीत पाण्याबरोबरच, पेट्रोल-डिझेल पाझरत असल्याने मला माझी चार एकर शेती पडीक ठेवावी लागली आहे. त्यामुळे मला उभ्या शेतात पिक घेता न आल्याने खूप मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे कंपनीने त्वरित नुकसान भरपाई द्यावी.