Pune News : मुंढवा : येथील महात्मा फुले चौकात भरधाव डंपरने पादचारी महिलेला जोरदार धडक दिली. या अपघातात महिला गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. मंगळवारी (ता. ११) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचे नाव लिलाबाई देवप्पा कांबळे (वय ६७, रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा) असे आहे. लिलाबाई कांबळे या बधे वस्तीमध्ये भाजीपाला आणण्यासाठी गेल्या होत्या. भाजीपाला घेऊन त्या चौकातून पायी घरी निघाल्या होत्या. (Pune News) रस्ता ओलांडत असताना खराडीकडून मुंढव्याकडे वळणाऱ्या मालवाहतूक डंपरची (क्रमांक एम. एच. १२ के. पी. २१६२) त्यांना जोरदार धडक बसली. धडकेमुळे त्या डंपरच्या चाकाखाली फेकल्या गेल्या. गंभीर जखमी झालेल्या लिलाबाई यांना उपचारासाठी तत्काळ ससून रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केले.
महात्मा फुले चौक रहदारीसाठी अत्यंत धोकादायक
मुंढव्यातील महात्मा फुले चौकात यापूर्वी देखील अनेक निरपराध नागरिकांचे नाहक जीव गेले आहेत. हा चौक रहदारीसाठी अत्यंत धोकादायक झाला आहे. मात्र, येथील प्रशासन अद्यापही ढीम्म आहे. अजून किती नागरिकांचा बळी गेल्यावर प्रशासनाला जाग येणार, असा प्रश्न संतप्त नागरिक विचारत आहेत.
महात्मा फुले चौकाचे रूंदीकरण, पादचाऱ्यांसाठी उड्डाणपुलाची उभारणी, रस्ता दुभाजक करणे, अशी अनेक कामे कित्येक वर्षे प्रलंबित आहेत. या दरम्यान, अनेकजण आमदार झाले, नगरसेवक बदलले, परंतु या चौकातील गैरसोयींकडे सर्वांनीच जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याची बाब या अपघाताच्या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. (Pune News) वाहतूक विभागाच्या पोलिसांचेही याकडे दुर्लक्ष होत आहे.
फुले चौकातील वाहतूक कोंडी नियंत्रणासाठी अनेकदा रिक्षाचालक, सामाजिक कार्यकर्तेच वाहतूक नियोजनाचे काम करताना दिसतात. वाहतूक पोलीस मात्र पावती फाडण्याच्या कामात व्यग्र असल्याचे चित्र दिसते. (Pune News) दरम्यान, मुंढवा-खराडी बायपास रस्त्यावर दिवसा जड वाहनांना प्रवेश बंदी असल्याचे परिपत्रक निघालेले असतानाही या रस्त्यावर वाहनांची ये-जा कशी होते, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
महात्मा फुले चौकात शाळकरी विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला यांना रस्ता ओलांडताना तारेवरची कसरत करावी लागते. येथील रस्त्यांचे रुंदीकरण, तसेच डांबरीकरण करुन सुविधांकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
अपघात प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरिक्षक विष्णू ताम्हाणे करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : वाघोलीत लवकरच ‘ट्रॉमा केअर युनिट’; राज्य सरकारचा मोठा निर्णय!
Pune News : रस्ता चुकलेल्या आठ वर्षीय सिमरनची दीड तासात घडवली कुटूंबासोबत भेट