Pune News : पुणे : कांद्यावर ४० टक्के निर्यातशुल्क आकारण्याचा केंद्र सरकारचा निर्णय हा उत्पादकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान करून जाणार आहे. गेल्या वर्षभरात कांद्याला मातीमोल दर मिळाला, तेव्हा सरकारने डोळेझाक केली.
मात्र, आता कांद्याच्या दरात काहीशी वाढ होत असल्याचे जाणवताच केंद्राने उफरटा निर्णय लादल्याची भावना जिल्ह्यातील कांदा उत्पादकांमध्ये आहे. या निर्णयावर कांदा उत्पादक शेतकर्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयाबाहेर ज्येष्ठ कामगार नेते बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करण्यात आले. या वेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी
दरम्यान, केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटना आक्रमक झाली आहे. या वेळी बाबा आढाव म्हणाले की, राज्यातील अनेक भागांत शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र काही थांबत नाही. त्यावर केंद्र आणि राज्य सरकारने विशेष उपाययोजना करण्याची गरज आहे. पण त्यावर कोणत्याही प्रकारची भूमिका मांडली जात नाही.
आता कांद्याच्या निर्यातीवर ४० टक्के शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला गेला आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकर्यांनी जगायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्या निर्णयाविरोधात आम्ही ठिय्या आंदोलन केले आहे. केंद्र सरकारने निर्यात शुल्कचा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा भविष्यात तीव्र लढा उभारणार असल्याचा इशारा या वेळी बाबा आढाव यांनी दिला.