Pune News : पुणे, ता.३१ : पुणे रेल्वे स्थानकातील संशयास्पद हालचाली टिपण्यासाठी आता कृत्रिम प्रज्ञेची (एआय) नजर राहणार आहे. स्थानकात अत्याधुनिक ‘इंटरनेट प्रोटोकॉल कॅमेरे’ बसविण्यात येणार आहेत. स्थानकावर लवकरच हा ३० दिवसांचा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येणार आहे.
३० दिवसांचा पथदर्शी प्रकल्प
रेल्वे मंत्रालयाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कामकाजात अधिकाधिक व्हावा, यासाठी पावले उचलली आहेत. याअंतर्गत प्रत्येक रेल्वे विभागाला कोणत्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करता येईल, याबाबत प्रस्ताव मागविण्यात आले होते.
पुणे विभागाने एकूण सात प्रकल्प मुख्यालयाकडे सादर केले होते. त्यातील टेहळणी यंत्रणेचा प्रस्ताव मुख्यालयाने मंजूर केला आहे. यात स्थानकावर ‘इंटरनेट प्रोटोकॉल कॅमेरे’ बसवून टेहळणी केली जाणार आहे. जिओ प्लॅटफॉर्म्सच्या मालकीच्या जिओ थिंग्ज लिमिटेड कंपनीला हे काम देण्यात आले आहे. विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे यांनी अंतिम मंजुरी दिल्यानंतर या प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू होणार आहे.
रेल्वे स्थानकाचे प्रवेशद्वार आणि बाहेर पडण्याचे द्वार, आरक्षण केंद्रातील तिकीट खिडक्या येथे हे चार कॅमेरे बसविले जाणार आहेत. याचबरोबर स्थानकात सध्या असलेल्या सीसीटीव्ही यंत्रणेत जिओ ब्रीज ही उपकरणे बसविली जाणार आहेत.
दरम्यान, यामुळे प्रवाशांची संख्या मोजणे आणि ते रांगेत आहेत की नाहीत या बाबी कळणार आहेत. रेल्वे स्थानकातील संशयास्पद हालचाली, तिकिटाचा काळाबाजार, बेकायदा पद्धतीने रांगा लावणे आदी गोष्टी या कॅमेऱ्यांमुळे शोधता येतील. त्यामुळे त्यांना आळा घालणे शक्य होईल.