Pune News : पुणे : राज्यात सर्वदूर पावसाचे आगमन झाले आहे. काही भागांमध्ये पुरेसा पाऊस सुरु झालेला नाही. मात्र, आगामी काळात चांगल्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पावसाळ्यात नदी-नाल्यांना येणाऱ्या पुरामुळे अनेक दुष्परिणामांचा सामना करावा लागतो. मुसळधार पावसामुळे शहरात बिकट परिस्थिती निर्माण होते. हे टाळण्यासाठी महापालिकेकडून नाल्यांवर सतर्कता प्रणाली (ॲलर्ट सिस्टिम) विकसित करण्यात येणार आहे.
राज्यात प्रथमच असा प्रकल्प
त्यामुळे पूर आल्यास अॅलर्ट मिळणार आहे. राज्यात प्रथमच असा प्रकल्प पुणे महानगरपालिकेकडून राबवला जात आहे.सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स्ड कॉम्प्युटिंगसेंटरच्या (सी-डॅक) मदतीने ही प्रणाली विकसित केली जाणार आहे. त्याबाबतचे प्राथमिक काम सी-डॅककडून सुरू करण्यात आले असून, पहिल्या टप्प्यात पुण्याच्या आंबिल ओढ्याची पथदर्शी प्रकल्प म्हणून निवड करण्यात आली आहे.
सी डॅकने या प्रणालीसाठी १०० वर्षांतील पावसाच्या आकडेवारीचे विश्लेषण केले आहे. शहरातील नदी, नाल्यांना पूर केव्हा येतो, किती मीमी पाऊस झाला म्हणजे नदी, नाले वाहू लागतात याचा अभ्यास केला. (Pune News) त्यानंतर ६० ते ६५ मिमी पाऊस झाल्यास नाले अन् गटारी वाहू लागतात, असे स्पष्ट झाले. यामुळे नाल्यांवरच सतर्कता प्रणाली विकसित करण्याचे काम करण्यात आले. पावसाळी वाहिन्या आणि गटारांची क्षमता वाढविणे आवश्यक असल्याचेही यानिमित्ताने अधोरेखित झाले आहे. मात्र, जुनी व्यवस्था बदलणे आव्हानात्मक आणि वेळ घेणारी प्रक्रिया असल्याने आता नाल्यांवरच सतर्कता प्रणाली विकसित करण्याचे महापालिकेने निश्चित केले आहे.
गेल्या पंचवीस वर्षांच्या पर्जन्यमानाचा उपयोग केला जात असून, नाल्यामधील पाण्याच्या पातळीबाबत या प्रणालीकडे संदेश दिला जाणार आहे. पावसाळ्यात नाल्यातून किती पाणी वाहते याचे मोजमापही या प्रणालीच्या माध्यमातून होणार आहे. पहिल्या टप्प्यात सी-डॅकडून आंबिल ओढ्यावर ही प्रणाली विकसित केली जाणार आहे. (Pune News) सतर्कता प्रणालीमुळे नाल्यातील पाण्याची पातळीची माहिती मिळणार असून, पुरापूर्वी नागरिकांचे स्थलांतर करणे शक्य होणार आहे. नाल्यातील पाण्याच्या पातळीचे निरीक्षण करण्यासाठी पर्जन्यमापक आणि सेन्सर बसविण्यात येणार आहेत.
सी-डॅककडून पुणे महापालिकेला नवीन प्रणाली विकसित करण्यासाठी मदत मिळाली आहे. या प्रणालीमुळे शहराचे पुरामुळे होणारे नुकसान कमी होणार आहे. तसेच अॅलर्ट मिळाल्यामुळे महानगरपालिकेला पुरेसा वेळ मिळणार आहे. त्या वेळेत बचाव कार्य करता येणार आहे. पुणे शहरातील हा प्रकल्प यशस्वी झाल्यास त्याची अंमलबजावणी राज्यातील इतर शहरांमध्ये करता येणार आहे. (Pune News) सध्या पुणे शहरातील एका नाल्यावर ही यंत्रणा बसवण्यात आली आहे. त्यानंतर टप्याटप्याने इतर ठिकाणी त्याचा वापर केला जाणार आहे.
याबाबत बोलताना पुणे महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन विभाग प्रमुख दणेश सोनुने म्हणाले की, सी-डॅककडून या संदर्भात काम सुरू करण्यात आले आहे. त्याचा आराखडा करण्यात आला असून, राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरणाकडे त्याचे सादरीकरण करण्यात आले आहे. काही तांत्रिक बाबींची पूर्तता केल्यानंतर या प्रणालीची अंमलबजावणी करण्यात येईल.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : कौटुंबिक वादातून मेव्हण्याने दाजीचे पाडले एका “बुक्कीत” चार दात..