Pune News : पुणे : गरीब रुग्णांची उपचाराअभावी परवड होऊ नये, त्यांना मोफत उपचार मिळावेत, यासाठी धर्मादाय विभागांतर्गत पुण्यात धर्मादाय रुग्णालयांच्या संख्येत १० ने वाढ केली आहे. आता धर्मादाय रुग्णालयांची संख्या ५६ वरून ६६ झाली आहे. पुण्यातील रूबी हॉल क्लिनिक, जहांगीर, पूना हॉस्पिटल, सह्याद्री हॉस्पिटल, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, संचेती हॉस्पिटल, इनलॅक्स व बुधराणी हॉस्पिटल यांसह पिंपरी-चिंचवड व ग्रामीण भागातील मिळून ५६ हॉस्पिटलचा यामध्ये समावेश आहे. यामुळे आता या हॉस्पिटलनाही धर्मादाय विभागाच्या नियमानुसार रुग्णांना सवलती द्याव्या लागणार आहेत.
धर्मादाय विभागाच्या नियमानुसार रुग्णांना सवलती
धर्मादाय विभागाकडे विविध सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था, ट्रस्ट, एनजीओ यांची नोंद असते. या संस्थेअंतर्गत सामाजिक कार्यासाठी हॉस्पिटल तयार केले जातात. (Pune News) ज्या हॉस्पिटलचे वार्षिक उत्पन्न पाच लाखांवर असते, ते धर्मादाय विभागाच्या अंतर्गत येतात. पुण्यात काही संस्थांनी अशी हॉस्पिटल काढली; परंतु त्यांची कल्पना धर्मादाय कार्यालयाला दिली नाही. उलट आम्ही ‘त्यातले’ नाहीच असाच त्यांचा समज होता.
दरम्यान, धर्मादाय कार्यालयाने अशा हॉस्पिटलचा शोध घेण्यास सुरुवात केली असता, त्यांना या हॉस्पिटलची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांना रीतसर नोटीस पाठवून, त्यांची नोंद धर्मादाय कार्यालयाकडे करून घेतली आहे.(Pune News) त्यामुळे आता त्यांनाही धर्मादाय विभागाच्या नियमाप्रमाणे रुग्णांना सवलती द्याव्या लागणार आहेत.
‘धर्मादाय’च्या अंतर्गत जी हॉस्पिटल आली आहेत, त्यांना धर्मादायची ‘महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियमच्या कलम ४१ क’ अंतर्गत मुंबई उच्च न्यायालयाने २००६ मध्ये गरीब रुग्णांसाठी तयार केलेली ‘आयपीएफ योजना’ लागू झाली आहे. त्यानुसार त्यांना एकूण उत्पन्नापैकी दोन टक्के निधी गरीब रुग्णांवर मोफत, सवलतीच्या दरात उपचारासाठी खर्च करावा लागणार आहेत.
रुग्णालयाच्या एकूण खाटांपैकी दहा टक्के खाटा या आर्थिक दुर्बल घटकांतील रुग्णांसाठी (ज्यांचे वार्षिक उत्पन्न ३ लाख ६० हजारांच्या आत) आहेत. त्यांना एकूण बिलामध्ये ५० टक्के सवलत देण्यात येते. (Pune News) या व्यतिरिक्त १० टक्के खाटा या निर्धन घटकांतील रुग्णांसाठी (ज्यांचे वार्षिक उत्पन्न १ लाख ८० हजारांच्या आत) आहेत. या रुग्णांना पूर्णपणे मोफत उपचार करणे बंधनकारक आहे.
पुणे विभागाचे सह धर्मादाय आयुक्त सुधीरकुमार बुक्के म्हणाले की, धर्मादायच्या अंतर्गत आणखी नवीन १० हॉस्पिटल आली आहेत. त्याबाबत त्यांच्या विश्वस्तांशी बोलून हे नवीन हॉस्पिटल समाविष्ट करून घेतले आहेत. आता त्यांना धर्मादाय विभागाचे नियम लागू झाले आहेत. यामुळे आणखी रुग्णांना सवलतीच्या दरात व मोफत उपचार मिळण्यास मदत होणार आहे.
– धर्मादाय रुग्णालयांच्या यादीत नव्याने समाविष्ट झालेली हॉस्पिटल पुढीलप्रमाणे :
१. दीनदयाळ मेमोरियल हॉस्पिटल, एफ. सी. रोड, पुणे
२. गिरीराज हॉस्पिटल, बारामती, पुणे
३. एस. हॉस्पिटल, पुणे
४. प्रशांती कॅन्सर केअर मिशन, सेनापती बापट रोड, पुणे
५. वैद्य पी. एस. नानल रुग्णालय, कर्वे राेड, पुणे
६. परमार हॉस्पिटल, औंध, पुणे
७. डॉ. जल मेहता रुरल क्रिटिकल केअर सेंटर, पुणे
८. साळी हॉस्पिटल, मंचर, पुणे
९. संजीवनी हॉस्पिटल, कर्वे रोड, पुणे
१०. जोशी हॉस्पिटल, सेनापती बापट रोड, पुणे
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : सोलापूर-मुंबई ‘वंदे भारत’ला प्रवाशांची पसंती..
Pune News : बेकायदा पिस्टल व जिवंत काडतुसे बाळगणार्याला सापळा रचून अटक
Pune News : आई आणि प्रेयसीच्या वादाने तरूण भलताच हैराण; थेट झाडावरच जाऊन बसला अन्…