Pune News : पुणे : पुणे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी पीएमपीएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सचिंद्र प्रताप सिंह यांनी कंबर कसली आहे. यापूर्वी पुणे महानगर परिवहन महामंडळ अर्थात पीएमपीएमएलमार्फत पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांच्या हद्दीत दैनिक आणि मासिक पास दिले जात होते. ग्रामीण भागातील प्रवाशांना पासची सुविधा नव्हती. आता सोमवारपासून ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी पास सेवा सुरु करण्यात आल्यामुळे प्रवाशांनी आनंद व्यक्त केला.
ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी पास सेवा सुरु
यापूर्वी ग्रामीण भागातील प्रवाशांना पीएमपीएमएलमधून तिकीट काढून प्रवास करावा लागत होता. परंतु आता पास सुरु केल्यामुळे नेहमी प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सोय होणार आहे. ग्रामीण भागात दैनिक आणि मासिक पास देण्यात येणार आहे. तसेच पीएमपीएमएल बसने १२० रुपयांत दिवसभरात कुठेही प्रवास करता येणार आहे.
पुणे शहरात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना या पास सुविधेचा लाभ घेता येणार आहे. दिवसभराचा पास १२० रुपयांमध्ये काढून कुठेही प्रवास करता येणार आहे. यामुळे पर्यटकांची आर्थिक बचत होणार आहे. सिंहगड किल्यापासून शनिवारवाड्यापर्यंत किंवा कात्रजपासून ते पिंपरी चिंचवडपर्यंतचा प्रवास शहर बससेवेने करता येणार आहे.
दरम्यान, पीएमपीएमएलने आता कात टाकली आहे. शहरातील प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा जास्तीत जास्त उपयोग होणे गरजेच आहे. यासाठी नुकत्याच १९२ वातानुकूलित बस पीएमपीएमएलने घेतल्या आहेत. यामुळे आयुष्य संपलेल्या बस आता बंद केल्या जाणार आहेत. पुणे शहरातील प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी या बसेस घेतल्या आहेत. तसेच पीएमपीएमएलच्या ताफ्यात टप्पाटप्याने ६५० बस येणार आहेत. यामुळे रोज प्रवास करणाऱ्या सुमारे दोन लाख प्रवाशांना याचा लाभ होणार आहे.