Pune News : पुणे : राज्यात यंदा मान्सूनने हुलकावणी दिली आहे. ऑगस्टअखेर मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची अपेक्षा असताना, संपूर्ण ऑगस्ट महिन्यात फक्त चार दिवस पाऊस झाला. यामुळे राज्यातील धरणांमधील जलसाठा मंगळवारपर्यंत ६४.७० टक्के असला तरी मागील वर्षीपेक्षा यंदा २० टक्के कमी आहे. सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस न झाल्यास यंदा राज्यात दुष्काळाचे सावट असणार आहे. राज्यात पुणे विभागात सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक या तीन विभागांतील १३ पेक्षा अधिक जिल्ह्यांमध्ये ५९ टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठी असल्याने स्थिती अत्यंत बिकट आहे. पुणे जिल्ह्यातील ५४ महसूल मंडळात २२ ते ३५ दिवसांचा पावसाचा खंड पडला आहे. यामुळे या ठिकाणी दुष्काळजन्य परिस्थिती आहे. राज्यातील धरणांमध्ये १०२६.६ टीएमसी पाणी मागील वर्षी होते. यावर्षी हा साठा ७३० टीएमसी आहे.
‘या’ जिल्ह्यांत परिस्थिती चिंताजनक…
पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी क्षेत्रात केवळ २७.६० टीएमसी पाणीसाठा आहे. पुणे परिसरात गेल्या तीन महिन्यांत केवळ ९४ टक्केच धरणे भरली आहेत. दरवर्षी ऑगस्ट अखेरपर्यंत पुणे शहराला पाणीपुरवठा करणारी चारही धरणे १०० टक्के भरतात. (Pune News) परंतु यावर्षी पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण साखळी क्षेत्रातील एकही धरण १०० टक्के भरले नाही. यामुळे पुणे शहराच्या पाणी पुरवठ्यासंदर्भात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.
राज्यात औरंगाबाद विभागात सर्वात कमी जलसाठा आहे. सध्या या विभागात ३७ टक्के जलसाठा आहे. मागील वर्षी या विभागात ८६ टक्के जलसाठा आहे. पुणे विभागात ७६ टक्के जलसाठा झाला आहे. मागील वर्षी ९५ टक्के जलसाठा होता. यंदा कोकण विभागाची परिस्थिती चांगली आहे. कोकण विभागात मागील वर्षीपेक्षा जास्त जलसाठा आहे. मागील वर्षी कोकणात ९० टक्के जलसाठा होता. तो यावर्षी ९२ टक्के आहे.
छत्रपती संभाजीनगर विभागात जायकवडी धरणात ३३.२४ टक्के पाणीसाठा असून, गेल्या वर्षी तो ९८ टक्क्यांपर्यंत होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत या विभागात पावसाने पाठ फिरविल्याने परिस्थिती खराब आहे. माजलगाव, मांजरा या धरणांध्ये १३ ते २३ टक्के पाणीसाठा, (Pune News) तर हिंगोली जिल्ह्यातील सिद्धेश्वर धरणात ४५ टक्के पाणीसाठा आहे. नांदेड, लातूर जिल्ह्यातील बहुतांश धरणांत गेल्या वर्षीपेक्षा कमी पाणीसाठा आहे.
पुणे शहराच्या पाणी पुरवठ्यासंदर्भात आज महत्वाची बैठक होणार आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. या बैठकीत धरणांमधील जलसाठ्याचा आढावा घेऊन आगामी वर्षभर पाणी पुरेल, या द्दष्टिने नियोजन करावे लागणार आहे. बैठकीत जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
– साठ टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा असलेले जिल्हे पुढीलप्रमाणे
बुलढाणा, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, परभणी, बीड, लातूर, हिंगोली, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर
– साठ टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा असलेले जिल्हे पुढीलप्रमाणे
पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नाशिक, नगर, अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशीम, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर आणि वर्धा
Pune News : जालन्यातील लाठीमारानंतर पुण्यात पोलीस बंदोबस्तात वाढ
Pune News: शिवाजीनगर न्यायालयातील कर्मचाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडले