Pune News : पुणे : एक मेट्रो रुळावर बंद पडलेली असताना, दुसरी मेट्रो रुळावर सोडल्याचा एक व्हिडिओ निलेश निकम यांच्या टि्वटर अकाउंटवरून व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. मेट्रोकडूनही तातडीने खुलासा करण्यात आला. याविषयी बोलताना मेट्रोचे अधिकारी हेमंत सोनवणे म्हणाले की, हा व्हिडिओ खालून घेतलेला असल्याने दोन्ही मेट्रो एकाच मार्गावर आल्याचे भासत आहे. परंतु प्रत्यक्षात दोन्ही मेट्रो वेगळ्या मार्गांवर आहेत. हॉर्न वाजवाऱ्या मेट्रोची सध्या चाचणी सुरू आहे. तसेच दोन्ही मेट्रो ट्रेन मुख्य मार्गावर नाहीत. त्या डेपोमध्ये ये-जा करण्याच्या मार्गावर आहेत. यामधील एक मेट्रो डेपोमध्ये जात आहे, तर दुसरी डेपोमधून मुख्य मार्गावर येत आहे. हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहिल्यानंतर हे लक्षात येते.
मेट्रोमध्ये अद्ययावत यंत्रणा…
दरम्यान, एक मेट्रो रुळावर बंद पडलेली असताना, दुसरी मेट्रो रुळावर सोडल्याचा एक व्हिडिओ निलेश निकम यांनी व्हायरल केल्याचे निदर्शनास येत आहे. रेंज हिल डेपोमध्ये ट्रॅकच्या खाली उभे राहून दोन्ही मेट्रो एकच ट्रॅकवर समोरासमोर आल्याचे व्हिडीओमध्ये सांगितले जात आहे. यामध्ये निलेश निकम मेट्रोचा भोंगळ कारभार असल्याचा दावा करत आहे. तसेच मेट्रो प्रशासनला कळवूनही अधिकारी आले नसल्याचे सांगत आहे.
या व्हिडीओनंतर तत्काळ विचारणा करण्यात आली. त्यावेळी मेट्रोचे अधिकारी हेमंत सोनवणे म्हणाले की, पुणे मेट्रो पूर्णपणे सुरक्षित आहे. मेट्रोने प्रवाशांची संपूर्ण काळजी घेतली आहे. मेट्रोच्या दोन ट्रेन एका मार्गावर कधीच येऊ शकत नाहीत. परंतु कधी असे झालेच तर पुणे येथे सुरु झालेल्या मेट्रोमध्ये अद्ययावत यंत्रणा बसवण्यात आली आहे. या तंत्रानुसार दोन्ही ट्रेन स्वतःहून एका विशिष्ठ अंतरावर थांबतील. त्यासाठी कोणत्याही मेट्रो कर्मचाऱ्याची वाट पहावी लागणार नाही.