Pune News : पुणे : मेट्रोला पुणेकरांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. सुट्ट्यांमध्ये पुणेकरांकडून मेट्रोला भरघोस उत्पन्न मिळत आहे. गुरूवारी (ता. ७) मात्र एक धक्कादायक घटना घडली. एक मेट्रो रुळावर बंद पडली होती. असे असताना दुसरी मेट्रो रुळावर सोडण्यात आल्याने भीषण अपघाताची शक्यता निर्माण झाली होती. प्रसंगावधान राखत धोक्याची घंटा वाजवल्याने दोन्ही ट्रेन एकमेकांसमोर थांबल्या. गुरुवारी दुपारच्या सुमारास हा प्रकार घडला.
मोठा अनर्थ टळला….
शिवाजीनगर मेट्रो स्थानकाजवळ दोन्ही मेट्रो एकमेकांसमोर आल्यामुळे धोकादायक स्थिती निर्माण झाली होती. सामाजिक कार्यकर्ते निलेश निकम यांनी या घटनेचे चित्रीकरण केले. बंद पडलेल्या मेट्रो रुळावर दुसरी मेट्रो सोडल्याने भीषण अपघाताची शक्यता निर्माण झाल्याने धोक्याची घंटा वाजवण्यात आली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
दरम्यान, अपघाताची परिस्थिती निर्माण झालेली असतानाही, मेट्रोच्या व्यवस्थापकांनी शांतपणे प्रतिक्रीया दिली. ते म्हणाले की, असे घडू शकते. ही घटना फारशी गंभीर नाही. सेफ डिस्टनसवर मेट्रो थांबतात. कंट्रोल आणि कमांड सिस्टीम चांगली आहे.
मात्र, मेट्रो बंद पडते ती सुरू न करता दुसरी मेट्रो सोडली जाते अशा वेळी कंट्रोल सेंटर काय करत होते, असा प्रश्न विचारला जात आहे.