Hadapsar News : पुणे, ता. ७ : जालन्यातील आंदोलनाचे लोण आता राज्यातील गावागावात पोहोचले आहे. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री आदेश देत नाहीत, तोपर्यंत पोलीस लाठीचार्च करू शकत नाहीत. शातंतामय मार्गाने मराठा आंदोलनकर्त्यावर लाठीचार्ज आणि गोळीबार केल्यामुळे राज्यभरातील मराठा तरुण पेटून उठला आहे. शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण हवे आहे. गरीब मराठा समाजाला ते मिळालेच पाहिजे, अशी भूमिका माजी आमदार महादेव बाबर यांनी मांडली.
हडपसर गांधी चौक ते गाडीतळ रॅली
हडपसर मराठा सकल समाजाच्या वतीने हडपसर गांधी चौक ते गाडीतळ रॅली काढण्यात आली. हडपसर गाडीतळ येथे माजी आमदार महादेव बाबर आणि महिलांनी हडपसर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वास डगळे आणि शिवले यांना निवेदन दिले. यावेळी माजी नगरसेवक योगेश ससाणे, महेंद्र बनकर, मराठा मोर्चाचे महेश टेळे, संदीप लहाने, हडपसर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष दिलीप शंकर तुपे, माजी अध्यक्षा मंदा नलावडे आदि मान्यवर उपस्थित होते.
महादेव बाबर म्हणाले की, मराठा तरुणांना नोकरी आणि शिक्षणामध्ये आरक्षण दिलेच पाहिजे. राज्यकर्ते मराठा आरक्षणाकडे गांभीर्याने पाहात नाही. शांततेने सुरू असलेल्या आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज केल्यामुळेच आंदोलनकर्ते आक्रमक झाले आहेत.
लाठीचार्जची निंदनीय बाब : चेतन तुपे
जालन्यातील मराठा आंदोलनकर्त्यांवर बळाचा वापर करून लाठीचार्ज आणि गोळीबार ही बाब अत्यंत निंदनीय आहे, असे आमदार चेतन तुपे यांनी सांगितले. तसेच राज्यकर्ते मराठा समाजाविषयी कायम दुटप्पी भूमिका घेत आहे, असा आरोपही त्यांनी केला.
मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे : शिवरकर
माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, त्यासाठी आम्ही न्याय मार्गाने लढा देऊन ते मिळविल्याशिवाय राहणार नाही, असे त्यांनी सांगितले.
मोदी, फडणवीसांना मराठा समाजाचा विकास होऊ द्यायचा नाही : जगताप
राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की, महागाई आणि बेरोजगारीवरील लक्ष विचलित करण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मराठा आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज, गोळीबार केला. नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांना मराठा समाजाचा विकास होऊ द्यायचा नाही. मांडलिक झालेला पाहायचा आहे. त्यामुळे आंदोलनकर्त्यांवर हल्ला केला असा थेट आरोप त्यांनी केला.
गृहमंत्र्यांनीच दिला लाठीचार्ज करण्याचा आदेश : मगर
माजी उपमहापौर नीलेश मगर म्हणाले की, गृहमंत्र्यांनीच लाठीचार्ज करण्याचा आदेश दिला. त्यामुळे हजारो मराठा बांधव जखमी झाले आहेत. त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून गृहमंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे.
यावेळी राष्ट्रवादी हडपसर विधानसभा अध्यक्ष डॉ. शंतनू जगदाळे, महिला अध्यक्षा वैष्णवी सातव, कार्याध्यक्षा सविता मोरे, दिलीप गायकवाड, निलेश काळे, सागरराजे भोसले, हनुमंत मोटे, सचिन मोरे, दिपाली कवडे, संजय शिंदे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विजय देशमुख, जिल्हा नियोजन समिती सदस्य अमोल हरपळे यांच्यासह युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल मोरे यांनी केले. तर आभार विशाल लहाने यांनी मानले.