Pune News : पुणे : चांदणी चौकाची स्थिती सध्या भुलभुलय्यासारखी झाली असून, यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. गैरसोय टाळण्यासाठी आता महापालिकेनेच कंबर कसली आहे. पाच प्रमुख रस्त्यांकडे कसे जायचे, याचे नकाशे तयार करण्यास सुरुवात केली आहे. महापालिकेकडून चांदणी चौकात ठिकठिकाणी कोथरूड, मुळशी, बावधन, सातारा व मुंबईकडे कसे जायचे याचे नकाशे लावण्यात येणार आहेत. त्यासाठी सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार लवकरच हे नकाशे तिथे लावण्यात येणार आहेत.
सर्वेक्षण सुरू
या चौकात पादचाऱ्यांसाठी देखील सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. इतर भागातून चांदणी चौकात आलेल्या प्रवाशांसाठी विविध आवश्यक उपाययोजना केल्या जाणार आहेत. पादचाऱ्यांना या चौकातून जाणे सोयीचे व्हावे, यासाठी प्राधान्याने उपाययोजना केल्या जाणार आहेत, अशी माहिती महापालिकेचे वाहतूक नियोजन अधिकारी निखिल मिजार यांनी दिली.
चांदणी चौकात महापालिकेतर्फे पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना केल्या जाणार आहेत. त्यामुळे नागरिकांच्या अडचणी दूर होतील. त्यासाठी आवश्यक वाहतूक चिन्हे व अन्य उपाययोजना केल्या जाणार आहेत. या चौकातील प्रकल्पाचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने केले आहे. प्राधिकरणातर्फे पादचारी पूलही उभारण्यात येणार असल्याचे महापालिकेचे अधिक्षक अभियंता युवराज देशमुख यांनी सांगितले.
याबाबत बोलताना येथील रहिवासी अक्षय भावसार म्हणाले की, नागरिकांचा त्रास दूर करण्यासाठी याठिकाणी भुयारी मार्ग, पदपथ बांधणे गरजेचे आहे. पादचारी संघटनेच्या सदस्या प्रांजली देशपांडे म्हणाल्या की, असोसिएशनची सदस्य या नात्याने मी यापूर्वीही पदपथ आणि क्रॉसिंगसाठी सूचना केल्या होत्या, परंतु महापालिका रस्त्याचे काम राज्य सरकार करणार असल्याचे सांगत राहिली आणि आमची सूचना नाकारली. पदपथ बांधण्यासाठी आता खरच खूप उशीर झाला आहे. मात्र आता महापालिकेच्या पुढाकाराने गोंधळ दूर होण्यास किती मदत होते ते पाहावे लागणार आहे.
सध्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने याठिकाणी दिशादर्शक फलक लावले नसल्याने वाहनचालक संभ्रमात आहेत. कोणता रस्ता कुठे जातो हेच समजत नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. एक रस्ता चुकला तरी वाहनचालकांना किमान दोन ते तीन किलोमीटरचा फेरा पडतो. वारज्याहून मुळशी व बावधनला जाणाऱ्या रस्त्यांवर तसेच कोथरूडहून मुंबईला जाणाऱ्या रस्त्यांवर फलक नसल्याचा वाहनचालकांना मोठा फटका बसत आहे.