Pune News : पुणे : महाराष्ट्र राज्य हे शैक्षणिकदृष्ट्या प्रगत राज्य म्हणून ओळखले जात होते. मात्र, राज्याच्या या प्रतिमेला तडा जाणारी एक आकडेवारी नुकतीच समोर आली आहे. राज्याच्या शालेय शिक्षणाच्या दर्जामध्ये घसरण झाल्याचे समोर आले आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने २०२१-२२ या वर्षांचा ‘परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स २.०’ हा अहवाल जाहीर केला असून, त्यात महाराष्ट्राची कामगिरी घसरल्याचे स्पष्ट झाले आहे. यापूर्वी महाराष्ट्र हा दुसऱ्या श्रेणीत होता. पण २०२०-२१ च्या अहवालात महाराष्ट्र सातव्या श्रेणीत गेला आहे. देशातील एकाही राज्याला पहिल्या पाच श्रेणींमध्ये स्थान मिळवता आलेले नाही, ही खेदाची बाब आहे.
काय म्हटलंय अहवालात?
शालेय शिक्षण प्रणालीचे मूल्यमापन करण्यासाठी ‘परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स’ अहवाल काढला जातो. २०२१-२२ साली मूल्यमापन निकषांमध्ये बदल करण्यात आले आहेत. सध्या याचे नामकरण ‘परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स २.०’ असे केले आहे. त्यानुसार ७३ निकषांवर मूल्यमापन करण्यात आले. (Pune News) निष्पत्ती आणि प्रशासकीय व्यवस्थापन या दोन गटांत हे निकष विभागले असून, त्यांची सहा क्षेत्रांमध्ये विभागणी केली आहे.
विभागणी केलेली सहा क्षेत्रे पुढीलप्रमाणे आहेत. अध्ययन निष्पत्ती, पायाभूत सुविधा, प्रशासकीय प्रक्रिया, शिक्षक शिक्षण आणि प्रशिक्षण, समानता, उपलब्धता आदींचा त्यात समावेश होतो. या मूल्यमापनात गुणांनुसार श्रेणी निश्चित करण्यात आली. त्यानुसार ९४१ ते १०० गुणांसाठी दक्ष, ८८१ ते ९४० गुणांसाठी उत्कर्ष, ८२१ ते ८८० गुणांसाठी अति उत्तम, ६७१ ते ८२० गुणांसाठी उत्तम, ७०१ ते ७६० गुणांसाठी प्रचेस्ट १, ६४१ ते ७०० गुणांसाठी प्रचेस्ट २, ५८१ ते ६४० गुणांसाठी प्रचेस्ट ३ आणि ४६० ते ५२१ या गुणांसाठी आकांक्षी श्रेणी देण्यात आली.
महाराष्ट्राला कोणत्या श्रेणीत स्थान?
दरम्यान, या वेळी केलेल्या मूल्यमापनामध्ये महाराष्ट्राला एक हजारपैकी ५८३.२ गुण मिळाले. त्यामुळे महाराष्ट्राचा समावेश ‘प्रचेस्ट ३’ या श्रेणीत झाला आहे. अध्ययननिष्पत्ती आणि गुणवत्तेमध्ये घसरण झाली आहे. या गटात २४० पैकी केवळ ६५.८ गुणांसह राज्य ‘आकांक्षी १’ या श्रेणीत गेले आहे. (Pune News) पायाभूत सुविधा गटात १९० पैकी ७३.४ गुणांसह ‘प्रचेस्ट ३’ ही श्रेणी मिळाली आहे. शिक्षक शिक्षण आणि प्रशिक्षण या गटात १०० पैकी ७३.६ गुणांसह अतिउत्तम श्रेणी प्राप्त केली आहे. शिक्षणाची उपलब्धता या गटात ८० पैकी ६४.७ गुण, तर समानता या गटात २६० पैकी २३३.४ गुण मिळवून उत्कर्ष श्रेणी मिळवत चांगली कामगिरी केली आहे.
‘प्रचेस्ट ३’ श्रेणीत कोणत्य राज्यांचा समावेश?
महाराष्ट्रासह गुजरात, केरळ, दिल्ली, पुदुच्चेरी, तमिळनाडू या राज्यांचा समावेश ‘प्रचेस्ट ३’ या श्रेणीत आहे. तर पंजाब आणि चंडिगढ या दोनच राज्यांनी ‘प्रचेस्ट २’ या श्रेणीत स्थान मिळवत आघाडी घेतली आहे. (Pune News) शिक्षक शिक्षण आणि प्रशिक्षणात महाराष्ट्राने अतिउत्तम हा दर्जा प्राप्त केला आहे. तर शिक्षण उपलब्धता, समानता गटात राज्याने उत्कर्ष श्रेणी मिळवली आहे.