Pune News पुणे : सोशल मीडिया काय व्हायरल होईल, ते सांगता येत नाही. अनेक व्हिडिओच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न मांडले जातात. काही संदेश दिला जातो. तर काहीवेळी केवळ मनोरंजन केले जाते. असे व्हिडिओ बघायला देखील छान वाटते. मात्र यातील काही व्हिडिओ असे असतात की त्याची चर्चा होते. कारण नागरिकाच्या रोजच्या जीवनाशी निगडीत असतात. त्यामुळेच ते चांगलेच भावतात देखील. असाच एक व्हिडिओ पुण्याच्या वाहतूक पोलिसांवर भाष्य करणारा समोर आला आहे.
पुण्यातील वाहतूक कोंडीमुळे श्वास गुदमरत….!
पुण्यातील वाहतूक कोंडीमुळे श्वास गुदमरत आहे. वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्याची कसरत नित्याचीच झाली आहे. त्यातून वाट काढली तर पांढऱ्या रंगाचा शर्ट घालेला आणि खाकी पॅंटवाला मामा समोर डोळे वटारुन उभाच असत म्हणजेच वाहतूक पोलिस. मार्च एंडमुळे वाहनचालकाला बाजूला घेतलेच जाते.
याला पोलिसांच्या कारवाईवाला वैतागून पुणेकर असलेल्या तरुणांनी एक व्हिडिओ काढला आहे.
आमच्याकडे लायसन्स आहे, आणि आम्हाला थांबवून तुम्ही आमचा आणि तुमचा वेळ वाया घालवू नका,’ असे लिहिलेले फलक हाती घेऊन तरुणांनी इन्स्टा रील्स करून वाहतूक पोलिसांना पुणेरी भाषेत चांगलेच टोमणे मारले आहेत. त्यामुळे याची चर्चा चांगलीच रंगली आहे.
वाहतूक पोलिस आणि आरटीओकडून सध्या चौकाचौकात दुचाकीस्वारांना थांबवून जोरदार कारवाई सुरू आहे. त्यामुळे वैतागलेल्या पुणेकर तरुणाईने मुठा नदीपात्रात इन्टाग्रामच्या माध्यमातून एक रील्स तयार केले आहे. त्यात त्यांनी दुचाकीवरून जात असताना वारंवार गाडी बाजूला घेण्यास सांगणार्या वाहतूक पोलिसांना टोमणे मारले आहेत.
यात दोन तरुण दुचाकीवरून जाताना आणि नदीपात्रातील घाटावर एक फलक हाती घेतलेले दिसत आहेत. त्या फलकावर ‘लायसन्स आहे, थांबवून आमचा आणि तुमचा वेळ घालवू नये,’ असे लिहिलेले आहे. या व्हिडीओला ‘आम्ही पुणेरी…’ हे गाणे लावण्यात आले आहे. त्यामुळे हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओला 12 हजार 300 ‘लाईक्स’आले आहेत. तर हा व्हिडीओ ‘इन्स्टा’वरच 3,369 जणांनी शेअर केल्याचे दिसत आहे.
वाहतूक नियमांचे पालन हे सर्वांनीच करायला हवे. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. मात्र, वाहतूक पोलिसांनीसुध्दा सिग्नल सोडून कोपर्याला दडी मारून, अशाप्रकारे कारवाई करणे चुकीचे आहे. पोलिसांनी जागोजागी होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यावर भर देऊन, वाहतूक नियम पाळण्याबाबत जनजागृती करावी. असे व्हिडिओ तयार करणाऱ्या सिध्देश वाघ या तरुणाने माध्यमांना सांगितले.