Pune News : पुणे : गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया…, एक दोन तीन चार, गणपतीचा जयजयकार… अशा जयघोषात ढोल-ताशांच्या निनादात घरोघरी एकदंताचे आगमन झाले आहे. घरोघरी तसेच सार्वजनिक गणेश मंडळात विघ्नहर्ता गणरायाचा दहा दिवसांचा मुक्काम असणार आहे. यामुळे सर्वत्र चैतन्याचे वातावरण आहे. याच दरम्यान, दुष्काळ, शेतमालाचे पडलेले बाजारभाव यामुळे सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आले आहेत. मात्र, विघ्नहर्त्या गणरायाने आपल्या भक्तांचे दुःख जाणून, उत्सवानिमित्त बहुसंख्य गरजू हातांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. यामुळे दुष्काळाचे मळभ दूर सारत सामान्यजन बाप्पांच्या उत्सवाची अनुभूती प्रसन्न चित्ताने घेत असल्याचे सकारात्मक चित्र जिल्ह्यात दिसत आहे.
पुढचे दहा दिवस पावसाच्या रूपाने बरस… भाविकांचे बाप्पाला साकडे!
यंदा पावसाने हुलकावणी दिल्याने सर्वत्र दुष्काळाचे सावट आहे. जुलै महिन्यापासूनच पावसाने दडी मारल्याने शेतकरी आभाळाकडे डोळो लावून बसला आहे. काही ठिकाणी ऐन पावसाळ्यात टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. यातून प्रतिकूल परिस्थितीत उत्पादित केलेल्या टोमॅटो व कांदा पिकाला बाजारभाव नाही. (Pune News ) त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे. या सर्व परिस्थितीत सर्वसामान्य कामगार, मजूराला रोजगार नसल्याची गंभीर परिस्थिती जिल्ह्यात आहे.
या पार्श्वभूमीवर सर्वांच्या लाडक्या गणरायाचे आगमन झाले आहे. उत्सव काळात भाविका गणेशमूर्ती सोबत मूषक, जाणवे, गोष आदी पुजेचे साहित्य खरेदी करताना दिसत होते. गणरायाच्या विधिवत प्राणप्रतिष्ठेसाठी लागणारे साहित्य, केळीचे खांब, कमळ, केवडा, दूर्वा, शमीपत्र, पाट, वस्त्र, खरेदी करण्यासाठी बाजारपेठांमध्ये प्रचंड गर्दी उसळली होती. पेढे, मोदक घेण्यासाठी तसेच गोडाधोडाचे पदार्थ घरीच तयार करण्यासाठी किराणा दुकानात देखील गर्दी झाली होती. दुकानातील मोदकांना मागणी वाढली होती. (Pune News ) डेकोरेशन, मंडप, सनई चौघडा, वाजंत्री, मनोरंजन करणारे कलाकार, केटरर्स यांना देखील या दहा दिवसांत पुरेसा रोजगार मिळणार असल्याने आनंद व्यक्त करण्यात येत आहे.
लाडक्या बाप्पाच्या आगमनाने अनेक हातांना रोजगार उपलब्ध झाला आहे. केळीचे खांब, दुर्वा, शमीपत्र, बेलपत्र, जाणवे, कमळ फुले, आदी पूजा साहित्याची विक्री करून अनेक हातांना हंगामी का होईना, पण रोजगार उपलब्ध झाला. या व्यवसायाच्या मिळकतीतूनच अनेक घरच्या चुली पेटल्या. (Pune News ) गणेशोत्सवात अनेकांकडून हार, फुलांची खरेदी करण्यात येते. या काळात दुकानात हार, फुलांच्या किमती वाढल्या असल्या, तरी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
राज्यातील बेरोजगारी कमी व्हावी, यासाठी शासन नवनवे धोरण आखत आहे. वेगवेगळ्या खात्यांतून जाहिराती येत आहेत. मात्र, पदांच्या भरतीसाठी कंपन्यांची नियुक्ती केली असली, तरी पारदर्शक परीक्षा घेण्यात या कंपन्या अपयशी ठरल्या आहेत. परीक्षा शुल्काच्या माध्यमातून जमा केलेला पैसा बेरोजगारांना त्रासदायक ठरत आहे. त्यातून कंत्राटी भरतीचा फतवा, यामुळे तरुणांना सरकार वाऱ्यावर सोडत असल्याचे निर्दशनास येत आहे. लाखो रूपये शुल्क भरून शिक्षण घेतले तरी नोकरीची हमी नाही. (Pune News ) बरोजगारांसाठी रोजगार देण्यात शासन अपयशी ठरले आहे. मात्र, सळसळता उत्साह घेऊन गणपती बाप्पा आले अन् हंगामी का होईना, बेरोजगारांना रोजगार मिळाला.
बाप्पा आता आलाच आहेस तर आमच्यावरील विघ्न दूर कर… बेरोजगारांना रोजगार, शेतमालाला बाजारभाव मिळू दे… दहा दिवस पावसाच्या रूपाने बरस… अशीच प्रार्थना सर्वसामान्य नागरिक, शेतकरी बाप्पाच्या चरणी करत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : माणुसकीला काळीमा! सख्ख्या मोठ्या भावाकडून लैंगिक अत्याचार; बहिणीने दिला बाळाला जन्म