Pune News : पुणे : गणेशोत्सवात दूरवर पोहोचणाऱ्या आणि लांबूनही दिसणारे ‘लेझर लाईट’चे प्रकाश किरण सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतात. मात्र, या लाइटकडे एकटक पाहिल्याने त्याचा डोळ्यांना त्रास होत असल्याची धक्कादायक माहिती आता समोर येत आहे. या उत्सवानंतर डोळ्यांना त्रास होत असल्याच्या तक्रारी वाढल्याचे निरीक्षण नेत्रतज्ज्ञांनी नोंदवले आहे. यंदा गणेशोत्सवानंतर डोळ्यांना ‘लेझर लाइट’चा फटका बसल्याची १५ प्रकरणे समोर आली आहेत. हे सर्वजण २० ते २५ वर्ष वयोगटातील आहेत. त्यातील काही गंभीर असून, संबंधितांची दृष्टी कायमस्वरूपी जाण्याचा धोका आहे, अशी माहिती नेत्रतज्ज्ञांनी दिली. ‘अमेरिकन अॅकेडमी ऑफ ऑप्थॅल्मोलॉजी’च्या अहवालानुसार पाच मिलिवॉटपेक्षा जास्त क्षमतेच्या ‘लेझर लाइट’मुळे नेत्रपटल खराब होण्याची शक्यता आहे.
सर्वजण २० ते २५ वर्ष वयोगटातील
यंदा दहीहंडी उत्सव त्याचप्रमाणे गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये अनेक गणेश मंडळांनी रथावर लेझर बीमचा वापर केला होता. त्याच्या प्रखर झोतामुळे डोळ्यांना इजा झाल्याच्या तक्रारी घेऊन अनेक तरुण मागील काही दिवसांत नेत्रविकार तज्ज्ञांकडे येत आहेत. लेझर लाइटमुळे काहींच्या डोळ्यांना इजा झाली. तपासणी केल्यानंतर डोळ्यांच्या पुढील स्तराच्या बुब्बुळावर जखमा झाल्याचे आढळले. (Pune News) डोळे दुखणे, डोळ्यातून पाणी येणे, तसेच प्रकाश सहन होणे, असा त्रास त्यांना होऊ लागला, अशी माहिती नेत्रतज्ज्ञांनी दिली. पुण्यातील नेत्र रुग्णालयांमध्ये अशा सुमारे १५ हून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. त्यांपैकी एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालयात चार रुग्णांची नोंद झाली आहे. ससून सर्वोपचार रुग्णालयात दोन, डॉ. दूधभाते नेत्रालयात दोन, तर शहरातील इतर खासगी रुग्णालयांमध्ये सात रुग्णांची नोंद झाली आहे.
लेझर बीमचा तीव्र प्रकाशझोत डोळ्यांवर पडल्यानंतर डोळ्यांवर ताण येऊन बाहुली आकुंचन पावते आणि डोकेदुखी सुरू होते. लेझर लाइटचे किरण नेत्रपटलाच्या मध्यभागी पडल्याने उष्णता तयार होऊन पडद्याला जखम झाली. नेत्रपटलाच्या खाली रक्तवाहिन्यांचे जाळे असते. (Pune News) त्यांना इजा पोहोचल्याने नेत्रपटलाखाली रक्तस्त्राव सुरू झाला. रक्तस्त्राव झाल्याने वाचनशक्ती आणि डोळ्यांची क्षमताही कमी होते. लेझर लाइटमुळे दृष्टिदोष होण्याचा प्रकार दुर्मीळ मानला जातो. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करता येत नाही, अशी माहिती नेत्रतज्ज्ञांनी दिली.
ससून सर्वोपचार रुग्णालयात मागील काही दिवसांत येणारे ५ ते ७ टक्के रुग्ण मोठ्या आवाजामुळे ऐकू येत नसल्याची तक्रार घेऊन येत आहेत. (Pune News) मिरवणूक काळात होणाऱ्या मोठ्या आवाजाचा त्रास असह्य झाल्याने येणाऱ्या रूग्णांचे प्रमाण जास्त आहे. असा त्रास झाल्यानंतर २४ तासांत उपचार घेतलेल्या रुग्णांची ऐकण्याची क्षमता पूर्ववत होण्याची शक्यता अधिक असते. मात्र, उपचाराला विलंब झाल्यास कायमचा बहिरेपणा येण्याचा धोका असतो.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : लेखक राजन खान यांच्या मुलाची आत्महत्या
Pune News : पुणे-दौंड रेल्वे मार्गावर विशेष मेगा ब्लॉक ; दोन दिवस अनेक गाड्या रद्द