Pune News : पुणे : पुणे ग्रामीण पोलीस दलात नोकरी करत असलेले करमाळा तालुक्यातील कोंढेज येथील पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे यांनी १७ मे २०२३ रोजी सकाळी ११ वाजून ४० मिनिटांनी जगातील सर्वोच्च शिखरावर आपला भारत, आपले महाराष्ट्र आणि महाराष्ट्र पोलीस दलाचा ध्वज फडकवला आणि सोलापूर जिल्ह्याचा पहिला एव्हरेस्ट वीर होण्याचा मान पटकावला. जिद्द, चिकाटी आणि मेहनत करायची तयारी असेल तर ध्येय गाठणे कठीण नसते, हेच ननवरे यांनी सिद्ध करून दाखवले. (Pune News)
जिद्द, चिकाटी आणि मेहनत या जोरावर मिळविले यश
एव्हरेस्टवीर शिवाजी ननवरे यांचे मूळ गाव सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील कोंढेज हे आहे. ८ ऑक्टोबर १९८५ रोजी एका मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांचा जन्म झाला. वडील शेतीकाम करतात, तर आई गुनाबाई या गृहिणी आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण गावातीलच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले, तर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण त्यांनी भारत हायस्कूल, जेऊर येथून पूर्ण केले. शाळकरी वयातच त्यांनी पोलीस अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते. यासाठी गावातील शिकलेल्या तरुणांचे मार्गदर्शन घेत त्यांनी विद्यार्थीदशेतच स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरु केला.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने २०१२ मध्ये घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकाच्या परीक्षेसाठी ते पूर्ण तयारीनिशी उतरले आणि उत्तम गुण मिळवून यशस्वी झाले. त्यांची पहिलीच पोस्टिंग २०१३ मध्ये गडचिरोली येथे झाली. गडचिरोलीसारख्या नक्षलवादी भागात साडेतीन वर्षे त्यांनी चोख कर्तव्य बजावले. विशेष अभियान पथकामध्ये देखील त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. त्यानंतर शिवाजी ननवरे यांची बदली पुणे ग्रामीण पोलीस दलात झाली. ते गेल्या ५ वर्षांपासून पुणे ग्रामीण पोलीस दलात कर्तव्य बजावीत आहेत.
पुणे ग्रामीण पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असतानाच ट्रेकींगची आवड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. सुट्टीच्या दिवशी आणि मिळेल त्या वेळेत पाठीवर अवजड बॅग घेऊन ते डोंगरमाळ पालथे घालत असत. आजवर अनेक शिखरे ननवरे यांनी पादाक्रांत केली होती. त्याचदरम्यान एव्हरेस्ट वीर भगवान चवले यांनी आयोजित केलेल्या हिमालयातील कांगस्त्ये २ या मोहिमेत शिवाजी ननवरे यांनी हिमालयातील ट्रेकिंगचा कोणताही अनुभव नसताना केवळ आपल्या फिटनेसच्या जोरावर सहभाग घेतला आणि ते शिखर सर केले.
एव्हरेस्ट शिखराकडे वाटचाल करण्यासाठी हे पहिले पाऊल होते. आता एव्हरेस्ट हाच ध्यास असल्याने हिमालयातील ट्रेकिंगचे शास्त्रशुद्ध ट्रेनिंग गरजेचे होते. त्यांनी २०२१ मध्ये मनाली येथे मौंटेनियरींग इन्स्टिट्युट येथे बेसिक मौंटेनियरींग कोर्स केला. ट्रेनिंगमधील सर्व टास्क त्यांनी लीलया पूर्ण केले. प्रत्येक गोष्टीत आघाडीवर राहणे, सकारात्मक मानसिकता या सर्व गोष्टींमुळे ते शक्य झाले.
दरम्यानच्या काळात सराव सुरूच होता. जगातील सर्वांत उंच एव्हरेस्ट शिखर गाठण्याची त्यांची मनीषा होती. माउंट एव्हरेस्ट शिखर सर मोहीम आखली होती. या मोहिमेमध्ये महाराष्ट्र पोलीस दलाच्या वतीने पुणे ग्रामीण पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे यांची निवड करण्यात आली. तो ननवरे यांच्यासाठी सुवर्णक्षण होता.
आपल्या एव्हरेस्ट मोहिमेविषयी ननवरे भरभरून बोलतात. मोहिमेची माहिती देताना ननवरे म्हणाले की, एक ऑक्टोबर २०१९ मध्ये एव्हरेस्ट चढण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर चार वर्षे सराव केला. त्यादरम्यान २०२० मधे स्टॉक कंग्री, कांगत्से २ ही सहा हजार मीटरची शिखरे सर केली. अटल बिहारी वाजपेयी माउंटेरिंग अँड अलाईट स्पोर्ट मनाली येथे तीस दिवसांचा बेसिक माउंटेनिंग कोर्स केला.
त्यानंतर २०२२ साली माउंट नून हे भारतातील तीन नंबरचे उंच आणि अत्यंत अवघड शिखर सर करण्याचा प्रयत्न केला. परंतु नैसर्गिक आपत्तीमुळे साडेसहा हजार मीटरवरून आम्हाला परत फिरावे लागले. मात्र, ७००० मीटर सर करताना जी ताकद लागली होती, त्यासाठी मला आणखी सरावाची आवश्यकता जाणवली आणि मी आणखी जोमाने सराव करू लागलो. अखेर २०२३ मध्ये मी एव्हरेस्ट सर करण्याचा निर्णय घेतला आणि तो प्रत्यक्षात आणला तो दिवस १७ मे २०२३ हा होता.
एवरेस्ट चढताना आलेल्या अनुभवाविषयी ननवरे म्हणाले की, एव्हरेस्ट चढणे म्हणजे स्वतःच्या मृत्यूला स्वतःच आमंत्रण देण्यासारखे आहे. माझ्यासोबत आलेला माझा सहकारी पुणे शहर पोलीस हवालदार स्वप्निल गरड याचा या मोहिमेदरम्यान मृत्यू झाला. त्याचा मृत्यू चटका लावून गेला. मी एव्हरेस्ट सर केला आहे, तुम्ही सुद्धा हे करू शकता, असे मी कोणालाही सांगत नाही.
कारण तुम्ही केलेला व्यायाम हा एव्हरेस्ट चढताना कामी येईलच असे नाही. प्रत्येकाचे शरीर वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त होत असते. चढताना अनेक नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागतो. जसजसे वर जाल, तसतसा ऑक्सिजन कमी व्हायला सुरूवात होते. या वेळी आपले शरीर कसे जुळवून घेते, हे पाहणे महत्त्वाचे असते. ऑक्सिजनअभावी बरेचजण आजारी पडतात.दरवर्षी एव्हरेस्ट चढाईदरम्यान १४ ते १५ टक्के लोकांचा मृत्यू होतो.
ननवरे यांनी घेतलेल्या आहाराबद्दल विचारले असता, वेगळा आणि विशेष असा आहार फॉलो केला नसल्याचे त्यांनी सांगितले. कोणत्याही पद्धतीची कृत्रिम प्रोटीन पावडर , विटामिन गोळ्या याच्यावर त्यांनी कधीही भिस्त ठेवली नाही. नेहमीचा आहार म्हणजे शुद्ध शाकाहारी होता. कारण त्यांच्या घरातील सर्व लोक माळकरी त्यामुळे त्यांच्या आहारात मोड आलेले कडधान्य आणि ज्वारी, बाजरी आणि त्यामध्ये सोयाबीन, नाचणी, मका, हुलगा, हरभरा एकत्र घालून त्या पिठाची भाकरी, शेवगा किंवा इतर आमटीबरोबर कुस्करून खाणे इतका साधा सोपा त्यांचा आहार होता. मानसिक क्षमतेसाठी देखील त्यांना वेगळी अशी तयारी करावी लागली नाही त्यांचा मित्रपरिवार त्यांचे नोकरीतील वरिष्ठ त्यांची कुटुंबीय यांची भक्कम साथ त्यांना लाभली.
एवरेस्ट चढण्याचा निर्णय का घेतला, या प्रश्नावर बोलताना ननवरे म्हणाले की, माझी एक इच्छा होती, आपण जन्माला आलो तर वेगळं काही करून दाखवायचं. यासाठी मी एव्हरेस्ट चढायचा निर्णय घेतला आणि तो प्रत्यक्षात आणला. मी एकच वाक्य बोलतो, ‘कन्सिस्टन्सी इज द की ऑफ सक्सेस’ सातत्य हीच यशाची गुरुकिल्ली आहे आणि मी चार वर्षे सातत्याने व्यायाम केला आणि तिथपर्यंत पोहोचलो.
सोलापूर जिल्ह्यातला पहिलाच एव्हरेस्ट वीर असल्याने गावकऱ्यांनी जंगी मिरवणूक काढून स्वागत केलं, खूप अभिमान वाटला. गावासाठी, जिल्ह्यासाठी, महाराष्ट्र पोलीस दलासाठी काहीतरी केल्याचं समाधान मिळालं. आता माझं पुढच्या ध्येय आहे आयर मॅन आणि कॉम्रेड मॅरेथॉन… मी लवकरच आफ्रिकेला जाऊन आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर किलीमॅनजारो आणि युरोपला जाऊन युरोपमधील माउंट एल्ब्रोस हे शिखर सर करणार आहे
महाराष्ट्र पोलीस दलातून आत्तापर्यंत दोन जणांनी एव्हरेस्ट शिखर सर केले होते. एक रफिक शेख, संभाजी गुरव आणि आता ननवरे हे तिसरे एव्हरेस्टवीर ठरले. एव्हरेस्ट गाठण्यासाठी केवळ जिद्द असून चालत नाही, तर आर्थिकदृष्ट्या सक्षम असणेही गरजेचे असते. सर्व मित्रांनी आणि सहकाऱ्यांनी ननवरे यांना तिथपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वतोपरी मदत केली. शिवाजी ननवरे यांच्या पराक्रमामुळे पुणे ग्रामिण पोलीस दलाच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पुणेकरांसाठी गुड न्यूज; वाहतूक कोंडीतून मुक्ती मिळणार; काय आहे नवी प्रणाली?
Pune News : पुण्यातून विमान प्रवास करणाऱ्यांना खूषखबर; आता “या” नव्या शहरांमध्येही विमाने उडणार