Pune News : पिंपरी : “माणूस केंद्रबिंदू मानून साहित्यनिर्मिती व्हावी!” अशी अपेक्षा लोकसाहित्याचे अभ्यासक आणि ज्येष्ठ साहित्यिक सोपान खुडे यांनी ना. धों. महानोर साहित्यनगरी, नवीन देहू – आळंदी रस्ता, मोशी येथे शनिवार, दिनांक १८ नोव्हेंबर रोजी व्यक्त केली. इंद्रायणी साहित्य परिषद आयोजित दुसऱ्या इंद्रायणी साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना सोपान खुडे बोलत होते. खासदार अमोल कोल्हे, आमदार महेश लांडगे, माजी उपमहापौर शरद बोऱ्हाडे, उद्घाटक डॉ. राजा दीक्षित, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. सागर देशपांडे, स्वागताध्यक्ष गणेश सस्ते, संतोष बारणे, इंद्रायणी साहित्य परिषदेचे अध्यक्ष संदीप तापकीर, समन्वयक अरुण बोऱ्हाडे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
सोपान खुडे पुढे म्हणाले की, “१०५ किलोमीटरच्या इंद्रायणी काठावर प्राचीन काळापासून खूप मोठे सांस्कृतिक वैभव नांदते आहे. संत, पंत आणि शाहीर यांनी मराठी भाषेला गौरवास्पद स्थान प्राप्त करून दिले; परंतु दुर्दैवाने आज दोन मराठी माणसे बोलताना मराठीविषयी न्यूनगंड बाळगतात. उच्चशिक्षितांपेक्षाही निरक्षर जनतेने खऱ्या अर्थाने मराठीचे संवर्धन केले आहे!” उद्घाटक डॉ. राजा दीक्षित म्हणाले की, “जागतिकीकरणात संस्कृतीचे सपाटीकरण होते आहे. या पार्श्वभूमीवर साहित्य संमेलनांचे महत्त्व अधोरेखित होते. स्वातंत्र्य समता, बंधुता आणि न्याय ही मूल्ये साहित्याच्या माध्यमातून जोपासली जातात. साहित्य हे मन जोडणारे अन् वेळप्रसंगी बंडखोरीला प्रवृत्त करणारे असते म्हणून अभिजात साहित्य जपताना नव्याचे स्वागत करण्याचे भान ठेवले पाहिजे!”
याप्रसंगी खासदार अमोल कोल्हे यांच्या हस्ते अरुण बोऱ्हाडे यांनी संकलित केलेल्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांच्याविषयीचे वृत्तपत्रीय लेख आणि अग्रलेखांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. अमोल कोल्हे म्हणाले की, “आजकाल खरे बोलण्यापेक्षा बरे बोलण्याला जास्त प्राधान्य दिले जाते. सर्वसामान्यांशी निगडित असलेल्या प्रश्नांचा ऊहापोह करण्याऐवजी मसालेदार विषय चघळण्यात माध्यमांना जास्त स्वारस्य आहे. इंद्रायणी संमेलनातून साहित्याची गंगा सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचली पाहिजे!” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
संदीप तापकीर यांनी प्रास्ताविक केले.
मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ साहित्यिक दादाभाऊ गावडे यांना प्रज्ञावंत पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले; तसेच संदीप तापकीर लिखित ‘रांगड्या दुर्गवैभवाचा खजिना – कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ले’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
श्री नागेश्वरमहाराज मंदिर, मोशी ते संमेलनस्थळ असलेल्या ना. धों. महानोर साहित्यनगरी या ग्रंथदिंडीने संमेलनाचा प्रारंभ करण्यात आला. जेजुरीच्या मार्तंड देवस्थानाचे विश्वस्त ॲड. पांडुरंग थोरवे यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचे पूजन करण्यात आले. इंद्रायणी साहित्य परिषद आणि ग्रामस्थ मंडळी यांनी संयोजनात परिश्रम घेतले. श्रीकांत चौगुले यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. डॉ. पौर्णिमा कोल्हे यांनी आभार मानले.
– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१/७४९८१८९६८२