Pune News : पुणे : जालन्यातील अंतरवाली सराटी या गावात आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठीमाराच्या घटनेमुळे संपूर्ण राज्यात तीव्र पडसाद उमटले आहेत. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये या घटनेचा निषेध म्हणून बंदची हाक देण्यात आली आहे. या घटनेमुळे माजी खासदार संभाजीराजे आणि खासदार उदयनराजे भोसले हे दोघे जालन्यात जाणार असून, आंदोलकांची विचारपूस करणार आहेत. याशिवाय राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे सुद्धा जालन्यात जात आहेत. दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलिसांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. या घटनेचे पडसाद पुणे शहरात उमटू नये म्हणून बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
संवेदनशील भागांत गस्त घालणार
अंतरवाली सराटी या गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संवैधानिक मार्गाने आंदोलनाला बसलेल्या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी घेराव घालत अमानुष लाठीचार्ज केला. शांततेच्या मार्गाने आपले हक्क मागण्यासाठी जमलेल्या मराठा समाज बांधवांना पांगवण्यासाठी गोळीबार केला. (Pune News) हे कृत्य अत्यंत निंदनीय असून कुणाच्या आदेशाने हे सर्व घडले याचा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ खुलासा करावा, अन्यथा तुम्हाला समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा संभाजीराजे यांनी दिला आहे. मराठा समाजाला दिलेल्या या अमानुष वागणूकीमुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला सर्वथा राज्याचे गृहमंत्री आणि सरकार जबाबदार असेल, असा इशाराही संभाजीराजे यांनी ट्विट करून दिला आहे.
या लाठीचार्जवरून खासदार उदयनराजे भोसले आक्रमक झाले असून, या घटनेचा त्यांनी निषेध केला आहे. शासनाने लक्ष घालून या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी उदयनराजे भोसले यांनी ट्विटद्वारे केली आहे. (Pune News) संभाजी ब्रिगेडनेही या घटनेचा निषेध नोंदवला आहे. तसेच राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
या पार्श्वभूमीवर पुण्यात केणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहआयुक्त संदीप कर्णिक यांनी दिले आहेत. गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे यांनी गुन्हे शाखेच्या पथकांना संवेदनशील भागात गस्त घालण्याचे आदेश दिले आहेत. (Pune News) पोलीस मुख्यालयात राखीव बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शहरात आयोजित केली जाणारी आंदोलनांची माहिती संकलित करण्यात येणार असून, महामार्गांवरील बंदोबस्तातही वाढ करण्यात आली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News: शिवाजीनगर न्यायालयातील कर्मचाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडले
Pune News : पतीचा पगार घेण्यासाठी कंपनीत गेलेल्या महिलेचा बॉसकडून विनयभंग; गुन्हा दाखल