Pune News : पुणे : पावसाळा सुरू झाल्यानंतर काही दिवसांतच शहरातील प्रमुख रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांची चाळण झाली. अनेक अपघात आणि तक्रारींनंतर खड्ड्यांची दुरुस्ती करण्यासाठी महापालिकेने पथ विभागाला बुधवार (ता. ९) पर्यंत मुदत दिली होती. ही मुदत आता संपुष्टात आली आहे. त्यामुळे अतिरिक्त आयुक्त स्वतः शहरातील रस्त्यांची पाहणी करणार असून, खड्डे आढळणाऱ्या ठिकाणी जबाबदार कनिष्ठ अभियंते व उपअभियंत्यांवर कारवाई केली जाणार आहे.
खड्डे आढळणाऱ्या ठिकाणी जबाबदार कनिष्ठ अभियंते व उपअभियंत्यांवर कारवाई
पुणे शरहारातील बहुसंख्य रस्त्यांवर अद्यापही खड्डेच खड्डे दिसत आहेत. या खड्ड्यांना कंटाळून महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी तीन आठवड्यांपूर्वी पथ विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन चार दिवसांत खड्डे बुजविण्याचे आदेश दिले होते. मात्र, पंतप्रधानांच्या पुणे दौऱ्यामुळे हे काम पुढे ढकलण्यात आले. त्यानंतर अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी दोन ऑगस्ट रोजी पथ विभागाची बैठक घेत नऊ ऑगस्टपर्यंत खड्डे बुजविण्याच्या सूचना दिल्या होत्या. (Pune News ) आता बुधवारी रात्री ही मुदत संपुष्टात आली. संबंधित अधिकाऱ्यांवर खरोखरच कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नगर रस्ता, सोलापूर रस्ता, मगरपट्टा रस्ता, पाषाण रस्ता, बाणेर रस्ता, संगमवाडी रस्ता, विमानतळ रस्ता, कर्वे रस्ता, पौड रस्ता, सातारा रस्ता, सिंहगड रस्ता, बिबवेवाडी रस्ता, नॉर्थ मेन रस्ता, गणेशखिंड रस्ता व बाजीराव रस्ता या ‘मिशन १५’अंतर्गत ‘आदर्श रस्त्यां’च्या कामाला प्राधान्य देऊन लवकरात लवकर खड्डे बुजवण्याच्या सूचना सर्व कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आल्या होत्या. आपल्या कार्यक्षेत्रातील मुख्य व जोड रस्त्यावरील; तसेच चौकांमधील खड्डे तातडीने बुजवावेत, त्यासाठी पालिकेकडे असलेले मन्युष्यबळ आणि साहित्य सामग्रीचा योग्य वापर करावा, असेही सांगण्यात आले होते. (Pune News ) नऊ ऑगस्टनंतर पाहणीत खड्डे आढळल्यास संबंधित कनिष्ठ अभियंत्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. संबंधित उपअभियंत्यांना जबाबदार धरण्यात येईल, असे ढाकणे यांनी स्पष्ट केले होते.
दरम्यान, आजपासून अतिरिक्त आयुक्त स्वतः शहरात फिरून पाहणी करणार आहेत. खड्डे आढळतील, तेथील कनिष्ठ व उप अभियंत्यांवर कारवाई केली जाईल, असे विकास ढाकणे यांनी सांगितले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : घरकुलासाठी तीन महिने मुदतवाढ; आमदार थोपटे यांचा भोंगवली ग्रामस्थांनी केला सत्कार!