Pune News पुणे : आम्ही दोघे एकाच कॉलेजमध्ये होतो. तेथेच आमची ओळख झाली. तो माझ्या प्रेमात पडला. एक दिवस त्याने मला प्रपोज केले. परंतु मी नकार दिला. त्यानंतर मी त्याच्याशी बोलणे पूर्णपणे बंद केले. मग त्याने मला ठार मारण्याची धमकी द्यायला सुरूवात केली. (Pune News) तो मला मारहाण देखील करत होता. मी या प्रकाराची तक्रार केली, हे समजताच पुढे हा भयानक प्रसंग घडला… शहरातील सदाशिव पेठ या मध्यवर्ती भागात मंगळवारी भरदिवसा ज्या तरुणीवर कोयता हल्ला झाला, त्या तरुणीने कथन केलेले हे वास्तव त्याहून धक्कादायक आणि सुन्न करणारे आहे. (Pune News)
शहरातील सदाशिव पेठ या मध्यवर्ती भागात मंगळवारी भरदिवसा एमपीएससी करणाऱ्या एका तरुणीवर शंतनू जाधव या माथेपिरू तरुणाने कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला. या खळबळजनक घटनेनंतर संपूर्ण पुणे हादरले. हल्ला करणारा तरुण सध्या पोलीस कोठडीत आहे. हा हल्ला झाल्यानंतर संबंधित तरुणीने हे धक्कादायक वास्तव पोलिसांसमोर सांगितले.
हा युवक कोयता हातात घेऊन तरुणीवर हल्ला करण्यासाठी धावत होता. ती युवती जीव वाचवण्यासाठी सैरावरा पळत होती. जीव वाचवण्यासाठी तीने एका बेकरीतशिरण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेऊन बेकरीतील व्यक्तीने शटर बंद केले. यावेळी स्वतःचा जीव धोक्यात घालून लेशपाल जवळगे या युवकाने धाडसाने तिला वाचवले. त्या तरुणीवर हल्ला करणारा तरुण नेमका कोण आहे? तो विध्वंसक कृत्य का करत होता? या दोघांची ओळख होती का? यासंदर्भात संबंधित तरुणीने पोलिसांना माहिती दिली.
संबंधित तरुणी पुढे म्हणाली की, मी प्रेमाला नकार दिल्यानंतर हा मुलगा माझ्यावर डूख धरून बसला होता. माझ्या कॉलेजजवळ येऊन मला सतत फोन करत होता. त्याने मला मारहाण देखील केली. तो सतत माझआ पाठलाग करत होता. त्याची ही कृती मला अस्वस्थ करत होती. त्याचा वाढता दबाव पाहून कंटाळून मी त्याची तक्रार त्याच्या कुटुंबियांकडेसुद्धा केली. परंतु त्यांनी कोणतीही दखल घेतली नाही. अखेर मी तक्रार केली. हे समजताच त्याने माझ्यावर कोयत्याने हल्ला केला. माझ्या हातावर आणि डोक्यावर या हल्ल्यात टाके पडले आहेत. या संपूर्ण प्रकरणात माझई काहीच चूक नाही. मात्र, मला खूप मोठी किंमत चुकवावी लागत आहे.
दरम्यान, या हल्ला प्रकरणानंतर पोलिसांच्या कामगिरीवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पुण्यातील सदाशिव पेठेतील पेरूगेट पोलीस चौकीत या घटनेनंतर पोलीस देखील उपस्थित नव्हते. घटना घडून गेल्यानंतर काही काळाने तेथे पोलीस आले. या प्रकाराची आयुक्तांनी गंभीर दखल घेतली असून, या चौकीतील तीन पोलिसांवर निलंबनाची कारवाई केली आहे.