Pune News : पुणे : पुण्यातील हडपसरमधील एका तरुणाने ‘हे हडपसर गाव आहे, इथं दुनियादारी नाही गुन्हेगारी चालते…’ असे रील बनवून थेट पुणे पोलिसांनाच आव्हान दिल्याची बातमी व्हायरल होताच, पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट सहाच्या पथकाने या तरुणाच्या मुसक्या आवळल्या आहेत. रील करणाऱ्या या तरुणाला पोलिसांनी एक अनोखी शक्कल लढवत शिक्षा सुनावली आहे. या तरुणाकडून एका व्हिडिओतूनच पोलिसांनी माफीनामा तयार करून घेतला आहे. या प्रकाराची परिसरात जोरदार चर्चा होत आहे.
परिसरात जोरदार चर्चा
पवन संतोष भारती (वय २०, रा. तरवडे वस्ती, मोहम्मदवाडी, पुणे) या तरुणाने बादशाह नावाचे रील बनवून थेट पुणे पोलिसांनाचा आव्हान दिले होते. ‘हे हडपसर गाव आहे, इथं दुनियादारी नाही गुन्हेगारी चालते’असे रील त्याने बनवले होते. या रीलमुळे पोलिसांची डोकेदुखी वाढल्याची बातमी ‘पुणे प्राइम न्यूज’ने प्रसिद्ध केली होती. (Pune News) यानंतर युनिट सहाचे पोलीस अधिकारी व अंमलदार हे सोशल मीडियावर गुन्हेगारी आशयाचे स्टेटस ठेवणाऱ्या पवन भारतीचा शोध घेत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार नितीन मुंढे यांना माहिती मिळाली की, पवन भारती हा शिंदे वस्ती येथील इंडस्ट्रियल एरिया येथे थांबला आहे. पथकाने तातडीने शिंदे वस्ती येथे जाऊन पवन भारतीला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे लोखंडी धारदार हत्यार आढळून आले. त्याला युनिट सहाच्या कार्यालयात आणून त्याचा माफीनामा घेण्यात आला. तसेच त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
आरोपीला पकडल्यानंतर पोलिसांनी एका व्हिडिओतूनच माफीनामा तयार करून घेतला आहे. या व्हिडीओत पवन याने म्हटले आहे की, ‘मी गुन्हेगारीचा सोशल मीडियावर व्हिडीओ टाकला. त्याबद्दल मी सर्वांची माफी मागतो. (Pune News) यापुढे अशा प्रकारची चुकी कधीच होणार नाही.’ या कारवाईमुळे अशा आशयाचे व्हिडीओ करण्यास कोणी धजावणार नाही, अशी प्रतिक्रीया पोलिसांनी व्यक्त केली.
ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल व त्यांच्या पथकाने केली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : ग्राफोलॉजी व्यवसायात जास्त परताव्याच्या आमिषाने तब्बल १७ लाखांची फसवणूक