Pune News : पुणे : चिंचवडगाव येथील वेताळनगरमध्ये पुनर्वसन प्रकल्पातील एका घराला शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली. गुरुवारी (ता. ७) ही घटना घडली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही.
इलेक्ट्रिक शॉर्टसर्किट
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, अशोक तेलंग यांचे कुटुंब वेताळनगर येथे पुनर्वसन प्रकल्पातील बिल्डींग क्रमांक ५ मध्ये पहिल्या मजल्यावर राहते. जुने कपडे घेऊन त्याबदल्यात भांडी विक्रीचा त्यांचा व्यवसाय आहे. दरम्यान, गुरुवारी सकाळी तेलंग आणि त्यांचे कुटुंबीय कामासाठी बाहेर पडल्यानंतर त्यांच्या घरात शॉर्टसर्किट होऊन घराला आग लागली. घरात मोठ्या प्रमाणात कपडे असल्याने आग पसरली आणि आगीचे लोट घराबाहेर येऊ लागले. याचवेळी घरातील फ्रीजच्या कॉम्प्रेसरचा स्फोट झाला. त्यामुळे परिसरात घबराट पसरली.
दरम्यान, या घटनेची माहिती तातडीने अग्निशमन विभागाला कळविण्यात आली. माहिती मिळताच त्वरित अग्निशमन विभागाची गाडी घटनास्थळी दाखल झाली. पिंपरी मुख्य केंद्र येथील दोन, थेरगाव, रहाटणी आणि प्राधिकरण येथील प्रत्येकी एक बंब घटनास्थळी दाखल झाला. जवानांनी काही वेळेत आगीवर नियंत्रण मिळवले.
घरातील कपड्यांना लागलेली आग काही वेळ सुरु होती. काही वेळाने कपड्यांमधून मोठ्या प्रमाणात धूर येवू लागला. हा धूर इमारतीमध्ये पसरल्याने नागरिकांची धावपळ उडाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी इमारतीतील अन्य नागरिकांना घरातून सुखरूप खाली आणले.
तेलंग यांचे संपूर्ण घर या आगीत जळून खाक झाले आहे. सुदैवाने घरात कोणी नसल्याने जीवितहानी झाली नाही. इलेक्ट्रिक शॉर्टसर्किट झाल्याचा प्राथमिक अंदाज असून, आगीचे नेमके कारण मात्र समजू शकलेले नाही.