Pune News : रांजणगाव गणपती : आजच्या डिजिटलच्या युगात मैदानी खैळ हद्दपार झाले आहेत, त्याचप्रमाणे हे मैदानी खेळ ज्याच्या बोटाला धरूण शिकायचे ते आजी आजोबा देखील काळाच्या पडद्याआड जाऊ लागले आहेत. नातवांना प्रेमळ आजी आजोबांचा सुखद सहवास मिळावा, यासाठी रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथील महागणपती ग्रूप ऑफ स्कूलमध्ये ‘प्रेमळ आजी-आजोबा’ हा उपक्रम राबविण्यात आला होता. या उपक्रमाला विद्यार्थी व परिसरातील आजी-आजोबांनी भरभरून प्रतिसाद दिला.
आजी-आजोबा’ उपक्रम
आजी-आजोबा म्हणजे दुधावरची साय, आजी-आजोबा म्हणजे संपूर्ण आयुष्याला पुरून उरेल, अशी अनुभवांची शिदोरी. नातवंडांचे पहिले मित्र-मैत्रिणी म्हणजे आजी-आजोबा होय… नातवंडांच्या वयाशी एकरूप होऊन त्यांना आयुष्यातील अमूल्य संस्काराची शिदोरी देणारे आजी-आजोबा म्हणजे नातवंडांचा जीव की प्राण असतो. याच आजी-आजोबांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महागणपती ग्रुप ऑफ स्कूलमध्ये ‘प्रेमळ आजी-आजोबा’ उपक्रम राबविण्यात आला.
या वेळी विद्यार्थ्यांच्या आजी-आजोबांना शाळेमध्ये आमंत्रित करून, त्यांच्यासाठी विटी-दांडू, लगोरी, आट्या-पाट्या अशा पारंपरिक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. हे खेळ खेळत असताना आजी-आजोबा त्यांचे सर्व दुःख विसरून नातवंडांबरोबर खेळ खेळण्यामध्ये रमून गेले. आजच्या विभक्त कुटुंब पद्धतीमुळे आजी-आजोबा हे घरांमधून दिसेनासे होत आहेत. आई-बाबा रागवल्यावर लहान मुलांना प्रेमाने जवळ घेणारे, त्यांची चूक त्यांना हळूवापरपणे समजून सांगणारे आजी-आजोबा ही काळाची गरज आहे. आजी-आजोबांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या दिवसाचे आयोजन करत असल्याचे संस्थेचे संस्थापक डॉ. विकास शेळके यांनी सांगितले.
प्रत्येक घरामध्ये जर आजी-आजोबा असतील, तर पाळणाघरांची गरजच भासणार नाही. आजी-आजोबांच्या प्रेमाची सर पाळणाघरांना कदापि येणार नाही, अशा शब्दांमध्ये शहाजी शेळके या आजोबांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्याचप्रमाणे दरवर्षी असा आजी-आजोबा दिवस शाळेमध्ये साजरा करण्यात यावा, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.
या वेळी शिवाजी शेळके आजोबांनी मुलांना खाऊ दिला. त्याचप्रमाणे मधुकर लांडे, शारदा लांडे, अंजना शेळके, यशवंत पाचुंदकर, लहानुबाई शेळके, आनंदराव पाचुंदकर, किसन रोडे, इंदुमती जलकोटे, ब्रह्मानंद जलकोटे, सिंधुबाई बोथरा, आबासाहेब नाणेकर या आजी-आजोबांनी खेळांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला.
या वेळी महागणपती ग्रुप ऑफ स्कूलचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विकास शेळके, महागणपती ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य अरविंद गोळे, पर्यवेक्षक निलेश पापळे, महागणपती इंग्लिश मीडियम स्कूलचे उपप्राचार्य अबेदा अत्तार, अक्षरनंदन गुरुकुल स्कूलच्या प्राचार्या वंदना खेडकर, श्री महागणपती ग्लोबल स्कूलच्या प्राचार्या पद्मिनी कवठेकर, विभाग प्रमुख सोनाली नलावडे आदी मान्यवर उपस्थित होते.