Pune News : पुणे : जालना जिल्ह्यात सुरु असलेले मराठा समाजाचे आंदोलक आणि राज्य सरकार यांच्या चर्चेतून अद्याप मार्ग निघत नसल्याचे चित्र आहे. मुख्यमंत्र्यांकडून आलेल्या शिष्टमंडळाला मंगळवारी (ता. ५) आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या मनोज पाटील जरांगे यांनी चार दिवसांची मुदत दिली आहे. जरांगे उपोषणावर ठाम असून, चार दिवसांत जीआर न निघाल्यास पाण्याचाही त्याग करणार असल्याचे जरांगे यांनी स्पष्ट केले होते. तर दुसरीकडे उपोषणाला बसलेले जरांगे यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे मराठा आंदोलनामुळे अडचणीत आलेल्या राज्य सरकारसमोरील अडचणी आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पाण्याचाही त्याग करणार
गेल्या नऊ दिवसांपासून मनोज जरांगे हे मराठा आरक्षणासाठी उपोषण करत आहेत. घशात इन्फेक्शन आणि शरीरात ताकद राहिली नसल्याने जरांगे यांना नीट बोलताही येत नाहीये. जरांगे यांची तब्येत बिघडल्याची माहिती मिळताच वैद्यकीय अधिकाऱ्यांचं एक पथक तातडीने उपोषणस्थळी हजर झालं. त्यांनी जरांगे यांना सलाईन लावत त्यांच्यावर प्राथामिक उपचार केले. त्यांनी उपोषण मागे घेण्याचे राज्य सरकारचे सर्व प्रयत्न वाया गेले आहेत. शासनाला तीन महिन्यांचा वेळ दिला होता. आणखी वेळ कशाला पाहिजे. चार दिवसांत मराठा समाजाला आरक्षण द्या. त्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही, अशी भूमिका मनोज जरांगे यांनी राज्य शासनाच्या शिष्टमंडळासमोर मांडली होती.
या वेळी जरांगे यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केला. सरकारने माझा जीवच घ्यायचे ठरवले आहे, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. दोन वर्षे मी सरकारसोबत तहच करतोय, त्यांनी आमच्या पदरात काहीच टाकलं नाही, अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
विशेष म्हणजे गेल्या वेळी मनोज जरांगे यांनी डॉक्टरांकडून उपचार करुन घेण्यास नकार दिला होता. मराठा आरक्षणाचा अध्यादेश राज्य सरकार जोपर्यंत काढत नाही, तोपर्यंत उपोषण सोडणार नाही अशी ठाम भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली आहे. अर्जुन खोतकर यांच्यासह राज्यातील अनेक मंत्र्यांनी जरांगे यांना समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. दरम्यान, जरांगे यांची प्रकृती खालावल्याची बातमी सर्वत्र पोहोचल्यानंतर जालना, औरंगाबादसह आसपासच्या जिल्ह्यातून मराठा कार्यकर्ते अंतरवाली सराटीकडे जायला निघाले आहेत. यामुळे गावात मोठी गर्दी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक संजय सक्सेना आणि जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी आज सकाळी जरांगे यांची अचानक भेट घेतली आणि विचारपूस केली. आंदोलकांनाही शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.