Pune News : पुणे : पुणे जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण प्रवाशांची २५ वर्षांची मागणी पूर्ण होणार आहे. बारामती-फलटण-लोणंद रेल्वेमार्ग आता प्रत्यक्षात उतरणार आहे. या मार्गासाठी ७८ टक्के भूसंपादनाचे काम पूर्ण झाले असून, येत्या दोन वर्षांत हा रेल्वे मार्ग उभारण्याचे रेल्वे मंत्रालयाचे उद्दिष्ट आहे. या मार्गासाठी निविदाही प्रसिद्ध झाली आहे.
७८ टक्के भूसंपादनाचे काम पूर्ण झाले…
रेल्वे मंत्रालयाने १९९७-९८ या काळातील रेल्वे अर्थसंकल्पातच या मार्गाला मंजुरी दिली होती. परंतु काम अजूनही सुरु झाले नव्हते. रेल्वे मार्गासाठी लागणाऱ्या भूसंपादनाच्या कामाला २० वर्षांचा काळ निघून गेला. आतापर्यंत फक्त फलटण-लोणंद हे भूसंपादन झाले आणि त्याठिकाणी रेल्वे मार्गही तयार झाला. परंतु बारामती-फलटण हे भूसंपादन अजूनही रखडले होते. मात्र, आता बारामती-फलटण-लोणंद रेल्वेमार्ग प्रत्यक्षात उतरणार आहे. या मार्गासाठी ७८ टक्के भूसंपादनाचे काम पूर्ण झाले आहे.
बारामती-फलटण-लोणंद या मार्गासाठी एकूण ६०० कोटी रुपयांच्या निविदा प्रसिद्ध झाल्या. डिसेंबर २०२५ पर्यंत हे काम संपविण्याचा प्रयत्न असल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी दिली. बारामती ते फलटण हा ३७ किलोमीटरचा रेल्वेमार्ग असून, येथे चार मोठे तर एकूण २६ मेजर पूल आणि २३ मायनर पूल असतील. तर ७ आरओबी असणार आहेत. न्यू बारामती, माळवाडी आणि ढाकाळे ही नवीन रेल्वे स्थानके या मार्गावर तयार केली जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात हा एकेरी रेल्वेमार्ग सुरु होणार आहे, अशी माहिती देशमुख यांनी दिली.