Pune News : पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्या लोकमान्य टिळक पुरस्कार देण्यात येणार आहे. या सोहळ्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार जाणार की नाही यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नसल्याने महाविकास आघाडीतील नेत्यांनी शरद पवार यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. आज सकाळी ज्येष्ठ गांधीवादी नेते कुमार सप्तर्षी यांनी देखील मोदी बागेतील शरद पवार यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. यामुळे शरद पवार नेमकी काय भूमिका घेणार, याबाबत सस्पेन्स कायम होता. असे असतानाच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या एका विधानाने शरद पवार हे उद्याच्या कार्यक्रमाला जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
रोहित पवार यांच्या एका विधानाने शिक्कामोर्तब!
पत्रकारांशी संवाद साधताना रोहित पवार म्हणाले की, पंतप्रधानांच्या कार्यक्रमाला शरद पवार उपस्थित राहिल्यास काही संभ्रम निर्माण होइल असे वाटत नाही. आयोजकांनी शरद पवार यांच्या माध्यमातूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कार्यक्रमाला बोलावले आहे. (Pune News) कार्यक्रमाला येणार म्हणून शरद पवार यांनी आयोजकांना शब्द दिला आहे. कार्यक्रम वेगळा आणि राजकीय भूमिका वेगळी असते. याला राजकीय भूमिकेतून पाहू नये, असे रोहित पवार म्हणाले. त्यामुळे शरद पवार हे उद्याच्या कार्यक्रमाला जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
शरद पवार यांनी राजकारण आणि समाजकारण कधीच एकत्र केले नाही. या संस्थेने अनेकांना गौरवले आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला सध्याच्या राजकीय परिस्थितीशी जोडू नये. राजकीय घटना घडामोडींच्या आधी हा कार्यक्रम निश्चित झाला आहे. (Pune News) या कार्यक्रमात कोण काय भूमिका घेते, हे पाहाणे महत्त्वाचे आहे. उद्याच्या मोदींच्या भाषणाकडे माझे लक्ष लागले आहे. मोदी उद्या राज्याला नवे प्रकल्प देतील, अशी आशा आहे, असंही ते म्हणाले.
दरम्यान गांधी, नेहरूंवर टीका करणाऱ्या भिडेंवर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. काही तरुण समाजमाध्यमांवर लिहितात तर त्यांच्यावर कारवाई होते. (Pune News) पुरोगामी विचारांच्या युवकांवर कारवाई केली जाते. मग भिडेंवर कारवाई का होत नाही? भिडेंना अटक झाली पाहिजे ही आमची मागणी आहे.