Pune News : पुणे : वीज चोरीसाठी कोण काय शक्कल लढवेल, हे सांगता येत नाही. महावितरणने वीजपुरवठा बंद केलेला असतानाही, वीजपुरवठ्यासाठी उभारण्यात आलेल्या अतिउच्चदाब रोहित्राला थेट मोठी केबल जोडून, वीजचोरी करणाऱ्या ‘महा’चोराचा महावितरणच्या केडगाव विभागाने ड्रोनच्या सहाय्याने छडा लावला आहे. जीव धोक्यात घालून वीज चोरी करणाऱ्या या चोराचे नाव मुकेश अगरवाल असे असून, या महाठगाला महावितरणने २ कोटी ४ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. अगरवालविरूद्ध शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
महावितरणने २ कोटी ४ लाख रुपयांचा दंड ठोठावला
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, सणसवाडी (ता. शिरुर) येथे मुकेश ओमप्रकाश अगरवाल (रा. अग्रसेन सोसायटी, कोरेगाव पार्क, पुणे) यांच्या मालकीच्या तीन वेगवेगळ्या कंपन्या आहेत. पैकी मे. थर्मोलाईट पॅकेजिंग इंडिया प्रा.लि. व मे. प्रकाश करुगेटेडे पुणे प्रा.लि. या दोन उच्चदाबाच्या तर मे. भगवान ट्यूब प्रा.लि. हे लघुदाब ग्राहक आहेत. (Pune News) तिनही कंपन्या एकाच आवारात आहेत. या कंपन्यांमध्ये प्रामुख्याने थर्माकोल व पुठ्ठा बनविण्याचे काम होते. मे. थर्मोलाईट पॅकेजिंग इंडिया प्रा.लि. या ग्राहक जोडणीचा वीजपुरवठा थकबाकीमुळे कायमस्वरूपी बंद केला होता तर इतर दोन वीज जोडण्यांचा वीजपुरवठा देखील थकबाकीच्या कारणास्तव तात्पुरता बंदच आहे.
दरम्यान, वीजपुरवठा बंद केलेला असतानाही अतिउच्चदाब रोहित्रातून थेट वीजपुरवठा सुरु केल्याची माहिती केडगावचे कार्यकारी अभियंता संदीप दरवडे यांना खबऱ्यामार्फत मिळाली. संबंधित ग्राहकाने गेटवर बंदोबस्त लावला व आत जाण्यास मज्जाव केल्याने, तसेच ही वीजचोरी मोठी असल्याने दरवडे यांनी ही बाब मुख्य अभियंता सुनिल पावडे यांच्या कानावर घातली. (Pune News) वीज चोरी पकडण्यासाठी पावडे यांनी ड्रोनची मदत घेण्याचे ठरवले.
वीज चोरी पकडण्यासाठी त्यांनी एक शक्कल लढवली. ठरल्याप्रमाणे २५ ऑगस्ट रोजी संदीप दरवडे आठ जणांच्या पथकासह तेथे गेले. कुरिअर पार्सल देण्याच्या निमित्ताने एका दुचाकीवरुन त्यांनी एका मित्राच्या मदतीने आत प्रवेश मिळवला. (Pune News) आत प्रवेश मिळताच ड्रोनद्वारे चित्रीकरण करण्यास सुरूवात केली. त्याचवेळी बाहेर दबा धरुन बसलेल्या टीमने ओळखपत्र दाखवून आत प्रवेश केला आणि वीज चोरीचा पर्दाफाश केला.
मे. प्रकाश करुगेटेड पुणे प्रा.लि (ग्रा.क्र. १८४८१९०४९४४०) या ग्राहकाला ४७३२९० युनीट वीजचोरीपोटी १ कोटी ११ लाख १९ हजार ८५७, मे. थर्मोलाईट पॅकेजिंग इंडिया प्रा.लि. (ग्रा.क्र. १८४८१९०२१८९२) या ग्राहकाला २०५६०६ युनीट चोरीचे ५१ लाख ३४ हजार ९७० तर मे. भगवान ट्यूब प्रा.लि (ग्रा. क्र. १८४८१९०३३४४०) या ग्राहकाला २३४९६१ युनीट चोरीसाठी ४२ लाख २५ हजार १६४ रुपये असे तीन ग्राहकांचे मिळून २ कोटी ४ लाख ७९ हजार ९८८ रुपये दंडाचे बील कंपनीचे मालक मुकेश ओमप्रकाश अगरवाल यांना देण्यात आले आहे. (Pune News) तसेच कार्यकारी अभियंता दरवडे यांच्या फिर्यादीवरुन भारतीय विद्युत अधिनियम २००३ कलम १३५ व १३८ नुसार शिक्रापूर पोलीस ठाण्यात वीजचोरीचा व वीज यंत्रणेस छेडछाड केल्याचा गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला आहे.
मुख्य अभियंता सुनिल पावडे, अधीक्षक अभियंता म्हसू मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता संदीप दरवडे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता किशोर शिंदे, उपकार्यकारी अभियंता नितीन महाजन, सहायक अभियंता गौरी काळंगे व बाळासाहेब टेंगले, कनिष्ठ अभियंता श्रीकांत ताटीकोंडा, जनमित्र विश्वनाथ किंदरे व ज्ञानेश्वर आहिरकर यांनी ही कामगिरी यशस्वी केली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पुण्यातील बुधवार पेठेत बांगलादेशी महिलांचा वेश्याव्यवसाय; १९ जणांवर कारवाई