Pune News : पुणे : मैदानावर किंवा एखाद्या सभागृहात, खोलीत, पाण्यात योगासने केल्याचे आपण पाहिले आहे. पण चक्क कोणी झाडावर योगासनांची प्रात्याक्षिक सादर केल्याच पाहिले आहे का ? नाही ना… येथे मात्र १४ वर्षीय सिद्धेश कडू या शालेय विद्यार्थ्याने झाडावर योगासने करण्याची लीलयाआत्मसात केली आहे. चक्रासन असो वा राजकपोत आसन… असे विविध आसन तो वेगवेगळ्या झाडांवर चढून सादर करत आहे. जागतिक योग दिनी त्याची ही कहाणी प्रेरणादायी अशीच आहे.
पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी
लहान वयात तेही झाडावर अनोख्या पद्धतीने तो योगासने करीत असल्याचे पाहून अनेकांना आश्चर्य वाटत असे. त्याच्या या कर्तबगारीचे सगळीकडून कौतुक होत आहे. (Pune News) झाडांवर योगासने करून तो ‘झाडे लावा, झाडे जगवा’चा संदेशही देत आहे.
सिद्धेश हा टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये इयत्ता नववीत शिकत आहे. वयाच्या आठव्या वर्षापासून योगासन करणाऱ्या सिद्धेश याच्या या आगळ्यावेगळ्या कौशल्याने अनेकांची दाद मिळवली. (Pune News) त्याचे वडील योग शिक्षक विठ्ठल कडू हे त्याला मार्गदर्शन करीत आहेत. वडिलांच्या कल्पनेने सिद्धेश याने झाडांवरच योगासने करण्यास आणि त्यातून वृक्षसंवर्धनाचा संदेश देण्यास सुरुवात केली. त्यांच्या या किमयागारीने लोकांपर्यंत योगासनांचे महत्त्व आणि वृक्षसंर्वधनाचा संदेश पोहोचत आहे.
या कर्तबगारीबद्दल त्याचे वडील विठ्ठल कडू म्हणाले, लहान वयापासूनच तो योगासने करत आहे. त्याला त्याची आवड असल्याने योगासनांचे प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. लहान वयात त्याने पन्हाळा ते पावनखिंड चालत सर केले. लिंगाणाही त्याने लहान वयातच सर केला. अनेक राष्ट्रीय स्पर्धांमध्येदेखील त्याने भाग घेतला असून, योग स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे. (Pune News) गेली आठ वर्षे तो योगासने करीत आहे. झाडावर योगासने करत असल्याने अनेकांना त्याचे आश्चर्य वाटते. मी त्याला याबाबत कल्पना सुचविली आणि त्याबद्दल सरावही करून घेतला. आज तो झाडांवर योगासने करीत आहे आणि त्याला सगळीकडून दादही मिळत आहे.
मी वडिलांकडून योगासने शिकलो. त्यांनीच मला झाडावर योगासने करण्यास शिकवले आणि त्यांच्यामुळेच मी अशी किमया करू शकलो. आज मी चार ते पाच फुटांपर्यंतच्या झाडावर चढून विविध योगासनांचे प्रकार सादर करतो. त्यातून आपली वनराई जपण्याचा संदेश देत आहे. मला असे करून खूप आनंद मिळत आहे आणि काहीतरी वेगळे करत असल्याचा अभिमान वाटतो आहे. असे सिद्धेश कडू याने सांगितले.