Pune News : पुणे : अजित पवार यांनी बंडखोरी केल्यानंतर राष्ट्रवादीच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. आता एक मोठी बातमी समोर आली आहे. अजित पवार यांच्या या बंडामागे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचाच हात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. आता राष्ट्रवादीच्या आमदारानेच खासदार सुप्रिया सुळे यांचं नाव घेत मोठा गौप्यस्फोट केला आहे. सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत भाजपसोबत सत्तेत जाण्याचं ठरलं होतं, असा गौप्यस्फोट आमदार सुनील शेळके यांनी केला आहे. या दाव्यामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
आमदार सुनील शेळके यांचा गौप्यस्फोट
अजित पवारांच्या बंडानंतर अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादीचे दोन्ही गट आक्रमक झालेले पहायला मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार सुनील शेळके यांनी केलेल्या या गौप्यस्फोटामुळे खळबळ उडाली आहे. (Pune News) शेळके यांच्या म्हणण्यानुसार, अजित पवार यांच्या घरी झालेल्या बैठकीला सुप्रिया सुळेदेखील उपस्थित होत्या. प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे, छगन भुजबळ हे नेतेही होते. सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. या वेळी भाजपसोबत सत्तेत जाण्याचं ठरलं. सत्तेत जायचं हे शरद पवार यांना विचारावं असं आम्हाला वाटत नव्हतं. उपस्थित नेत्यांनी सत्तेत जायचा निर्णय घेतला, असा मोठा गौप्यस्फोट सुनील शेळके यांनी केला आहे.
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, त्यादिवशी त्यांच्या देवगिरी या निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीला राष्ट्रवादीचे प्रमुख नेते उपस्थित होते.(Pune News) ही बैठक प्रदेशाध्यक्षपदासाठी असल्याची चर्चा होती. मात्र, नंतर घडलेल्या घटनाक्रमामुळे ही बैठक केवळ राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी झाली नसल्याचं स्पष्ट झालं. अजित पवार यांनी आम्हाला सत्तेत जाण्याबाबत स्पष्ट सांगितलं. आमच्याशी चर्चा केली. राज्याचा विकास साधणे तसेच लोकहिताची कामे मार्गी लावण्यासाठी सत्तेत जाणे अत्यंत गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं. सत्तेत राहायचं म्हणून आम्ही सह्या दिल्या, असंही सुनील शेळके यांनी स्पष्ट केलं.
बैठकीत झालेल्या चर्चेनुसार त्याच दिवशी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये घटकपक्ष म्हणून राष्ट्रवादी सहभागी झाली. यामुळे राष्ट्रवादीमध्ये कोणतेही गटातटाचे राजकारण झालेले नाही. (Pune News) यापूर्वी मी पक्ष आणि परिवारासोबत होतो, आजही आहे आणि यापुढेही असेन, असं शेळके यांनी सांगितलं.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पुण्याच्या पालकमंत्रीपदी कोणते ‘दादा’ विराजमान होणार?; चर्चांना उधाण!
Pune News : पुणे विमानतळावर महिला प्रवाशाकडून २० लाखांचे सोने जप्त ; सीमा शुल्क विभागाची कामगिरी..