Pune News पुणे : आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नाव उंचवणाऱ्या आणि देशाला अनेक सुवर्णपदके मिळवून देणाऱ्या महिला कुस्तीगिरांवर अन्याय होत आहे. त्याच्या निषेधार्थ छात्रभारती विद्यार्थी संघटनेच्या वतीने आज दिनांक 31 मे रोजी कलाकार कट्टा, फर्ग्युसन कॉलेज रोड येथे संविधानिक मार्गाने निदर्शने नोंदविण्यात आली. (Pune News)
“खासदार ब्रिजभुषण सिंग यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप असताना भाजपा सरकार त्यांना पाठीशी घालत आहे. गेल्या 38 दिवसांपासून या सर्व महिला खेळाडू दिल्लीच्या जंतर-मंतरवर शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहेत. परंतु, देशाचे नाव जगापुढे उंचवणाऱ्या खेळाडुंना रविवारी ज्या पद्धतीने पोलिस बळाचा वापर करुन फरफटत नेण्यात आले हे अत्यंत निंदनीय आहे,” असे छात्रभारतीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रफुल कांबळे म्हणाले. तर, “देशाला आंतरराष्ट्रीय पातळीवरचे मेडल मिळवून देणाऱ्या महिलांवर अत्याचार होत असेल तर आमच्यासारख्या सर्वसामान्य मुलींचे काय ? असा प्रश्न उपस्थित राहतो. अत्याचारी मात्र नव्या संसदेत फोटो काढत तोऱ्यात जगत आहेत,” असे जिल्हा संघटीका दिव्या कांबळे म्हणाली.
यावेळी राज्य कार्यवाह अनिकेत घुले, राज्य कार्यकारिणी सदस्य तुकाराम डोईफोडे, माजी कार्यकर्ते प्रवीण गुंजाळ, राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते प्रकाश कदम, छात्रभारती पुणेचे संघटक सौरव शिंपी, वैष्णवी कोळी, मिलिंद कांबळे, मुस्कान नदाफ, अजय कांबळे, अभिलाषा दुधपचारे, वैभव रंधे, आरती म्हस्के, अर्पिता पवार, श्रुती थोरात, शुभम माळवे, ओम जाधव, कुष्णा कोपर्डे, देवा भालेराव, जयवंत गुरव, नेत्राली ठोंबरे, ऋषी कोकरे, हर्षदीप पोळ आदी कार्यकर्ते व विद्यार्थी उपस्थित होते.