Pune News : पुणे : क्रिकेट वर्ल्डकपमधील ५ सामने पुण्यातील गहुंजेमधील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडीयमवर होणार आहेत. या सामन्याची तिकीटे मिळत नसल्याने अनेक क्रिकेटप्रेमी नाराजी व्यक्त करत होते. भारत विरुद्ध बांगलादेश क्रिकेट सामना पाहण्यासाठी ब्लॅकने तिकीट खरेदी करण्याची तयारीही अनेकांनी दाखवली. याचाच गैरफायदा घेऊन १२०० रुपयांचे तिकीट १२ हजार रुपयांना विकणाऱ्या दोघांना पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने मुकाई चौक, रावेत येथे काल रात्री अटक केली. तिकिटे पुरवणाऱ्या त्यांच्या साथीदारांवर याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
दोघांना रावेत येथे अटक
पुण्यातील गहुंजेमधील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडीयमवर होणाऱ्या पाचपैकी एका सामन्यात भारताचा सामना असल्याने तिकिटांसाठी क्रिकेटप्रेमींची गर्दी झाली होती. हा भारत विरुद्ध बांगलादेश सामना आज दुपारी दोन वाजता येथे सुरु झाला आहे. (Pune News) या सामन्याच्या तिकिटांच्या काळ्या बाजारावर पिंपरी-चिंचवड पोलिसांचे बारीक लक्ष होते. साध्या वेशातील पोलीस काही दिवसांपासून स्टेडीयम परिसरात पाळत ठेवून होते.
दरम्यान, मुकाई चौक, रावेत येथे कोहिनूर सोसायटीच्यासमोर काही दलाल क्रिकेट सामन्याची तिकिटे जास्त दराने विकत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी बुधवारी रात्री सापळा लाऊन रवी लिंगप्पा देवकर, अजित सुरेश कदम या दोघांना ताब्यात घेतले.(Pune News) त्यांच्याकडून भारत विरुद्ध बांगलादेश क्रिकेट सामन्याची १२०० रुपये दाराची पाच तिकिटे मिळून आली. या दोघांकडून पोलिसांनी ५ तिकिटे, ३८ हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल फोन, ७ हजार रुपये रोख रक्कम असा एकूण ५१ हजारांचा ऐवज जप्त केला. रवी देवकर आणि अजित कदम यांना त्यांचा साथीदार युनुस शेख याने ही तिकिटे पुरवल्याचे तपासात निष्पन्न झाले. या तिघांवर रावेत पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : ललित पाटीलच्या दोन मैत्रिणींना नाशिकमधून अटक; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होणार?